माढातून सदाभाऊ खोत, बारामतीतून जानकर रिंगणात

माढातून सदाभाऊ खोत, बारामतीतून जानकर रिंगणात

  • Share this:

mahadev jankar01 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीत सुरू असलेल्या माढाचा तिढा अखेर सुटला आहे. माढ्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर हातकणंगलेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आलीय. या जागेवरून राजू शेट्टी लोकसभा निवडणूक लढवणार आहे. तसंच बारामतीची जागा राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्या सोडण्यात आली आहे. आणि सातार्‍याची जागा आरपीआयला सोडली आहे.

महायुतीच्या नेत्यांची यासंदर्भात 'मातोश्री'वर बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. यानंतर भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली.

शिवसेनेनं दोनच दिवसांपूर्वी 15 उमेदवारांची यादी जाहीर केलीय. पण महायुतीत अलीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी झालीय. पश्चिम महाराष्ट्रात स्वाभिमानी संघटनेचा पाया मजबूत असल्यामुळे माढा आणि सोलापूरची जागा देण्यात यावी या अटीवर स्वाभिमानी महायुतीत दाखल झाली होती. जर माढाची जागा दिली नाहीतर महायुतीतून बाहेर पडू असा इशाराच राजू शेट्टी यांनी दिला होता.

तर दुसरीकडे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनीही माढाच्या जागेवर दावा केला होता. अखेर दोन्ही नेत्यांची समजूत काढण्यात महायुतीच्या नेत्यांना यश आलंय. माढाची जागा स्वाभिमानीचे नेते सदाभाऊ खोत यांना देण्यात आली तर बारामतीची जागा महादेव जानकर यांच्यासाठी सोडण्यात आलीय. विशेष म्हणजे माढा आणि बारामती हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादीचे बालेकिल्ले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा गडाला सुरूंग लावण्यासाठी महायुतीने 'स्वाभिमानी'ला पुढे केलं आहे. माढातून राष्ट्रवादीने विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर बारामतीतून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देण्यात आलीय. त्यामुळे सदाभाऊ खोत विरुद्ध मोहिते पाटील आणि बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध महादेव जानकर अशी लढत पाहण्यास मिळणार आहे.

First published: March 1, 2014, 8:31 PM IST

ताज्या बातम्या