News18 Lokmat

डोळ्यात अंजन घालणारा 'फँड्री'

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 18, 2014 05:34 PM IST

डोळ्यात अंजन घालणारा 'फँड्री'

अमोल परचुरे, समीक्षक

गेल्या वर्षभरात जगभरातील फिल्म फेस्टिव्हलमध्ये ज्या मराठी सिनेमाची चर्चा होती तो सिनेमा म्हणजे फँड्री..हा सिनेमा खर्‍या अर्थाने जागतिक सिनेमांशी स्पर्धा करेल असा खरा भारतीय सिनेमा...अप्रतिम, आऊटस्टँडिंग, दर्जेदार, आशयघन, फ्लॉलेस अशी जी काही विशेषणं आहेत ती सगळी या फँड्रीसाठी वापरता येतील. नागराज मंजुळे या दिग्दर्शकाने मराठी इंडस्ट्रीसाठी, भारतीय सिनेमासाठी डोंगराएवढं काम करुन ठेवलेलं आहे. 'लंचबॉक्स', 'शिप ऑफ थिसेस' अशा सिनेमांच्या रांगेतही सर्वात वर बसू शकेल असा हा फँड्री..

'फँड्री'बद्दल

fandry marathi movie

फँड्री हा एक अनुभव आहे, एक असा अनुभव जो सिनेमावर प्रेम करणार्‍या प्रत्येकाने घ्यायलाच हवा. पहिल्या फ्रेमपासून अगदी एन्ड टायटल्सपर्यंत प्रेक्षकाला बांधून ठेवणारा...कॅरेक्टर्स, त्यांचे इमोशन्स यांना प्रेक्षकांच्या मनाशी जोडणारा..समाजातलं वास्तव अगदी थेटपणे तुमच्या तोंडावर फेकणारा..तंत्राबरोबर वाहवत न जाता त्यातला आशय अगदी सहज पोचवणारा..फँड्री या सिनेमात अनेक पदर आहेत. बरं, सिनेमा आहे म्हणून त्यात काही समस्या मांडलीये, दिग्दर्शकाला काही संदेश वगैरे द्यायचाय असा अजिबात आविर्भाव नाहीये, उलट दिग्दर्शकाने त्याला जे सांगायचंय, जे मांडायचंय ते सिनेमाच्या चौकटीत अगदी व्यवस्थित बसवलंय. अमुक ठिकाणी सिनेमा सुरू होणार, अमुक ठिकाणी इंटरव्हल होणार आणि इच्छित स्थळी जाऊन सिनेमा संपणार हा पारंपरिक विचार इथे अजिबात नाहीये. सिनेमाची एक भाषा असते वगैरे सगळं मान्य करुनही एक वेगळा विचार, एक साधा सरळ सिनेमा बनवता येऊ शकतो, आणि साधं-सरळ असलं तरी त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो हे नागराजने दाखवून दिलंय.

Loading...

काय स्टोरी ?

fandry

कुणाला वाटेल की हा फेस्टीव्हल सिनेमा आहे, संथ सिनेमा आहे, पण अशी तुलना करण्याची गरजच नाही. सिनेमा म्हणून पाहिलं तर फँड्रीमध्ये एकतर्फी लव्हस्टोरी आहे, काळ्या चिमणीचा सस्पेन्स आहे, नागराजने स्वत: साकारलेल्या चंक्या या व्यक्तिरेखेचं गूढ आहे, बाप-मुलाचा संघर्ष आहे, पाठलाग आहे. याशिवायही अनेक बारीक बारीक गोष्टी आहेत ज्यामध्ये खूप मोठा अर्थ लपलेला आहे. रोजगार हमी योजनेची कामं, काही किलोमीटर अंतरावर असलेल्या शहराच्या तुलनेत गावातलं रखरखीत जगणं, शहरात व्हॅन हुसेनचं शोरुम आहे, तर गावात जत्रेशिवाय कपडे घेणं शक्य नाहीये, गावातल्या कोणत्याही जमातीत अगदी उघडपणे होणारा हुंड्याचा व्यवहार आहे, गावातल्या रिकामटेकड्या जगण्यात हातातल्या मोबाईलमध्ये फेसबुक आहे, पण घरात लोडशेडिंगमुळे दिवसाउजेडी अंधार आहे. हाताला काम नसलं तरी डोक्यात आयपीएलची नशा आहे, अशा अनेक गोष्टी नागराजने अगदी सूचकपणे सतत पेरलेल्या आहेत. या गोष्टी सहजपणे सिनेमात येत राहतात आणि त्याच सहजतेने मुख्य कलाकारांचं जगणं, त्यांची सुख-दु:खं, त्यांचं हतबल होणं पडद्यावर दिसत राहतं, त्यांच्या वेदनेशी आपणही अगदी लगेच एकरुप होऊन जातो, आणि तेच या फँड्रीचं सगळ्यात मोठं यश आहे.

परफॉर्मन्स

फँड्रीमध्ये काहीही फिल्मी नाहीये, त्यामुळे यात कलाकारांनी अभिनय केलाय असं वाटतच नाही. किशोर कदम यांनी आत्तापर्यंत अनेक ऑफबीट सिनेमांमध्ये जीव ओतून काम केलेलं आहे. या एवढ्या सिनेमांमध्ये आत्तापर्यंतचा सर्वोत्तम अभिनय हा 'फँड्री'मधलाच म्हणावा लागेल. बाकी प्रत्येक कॅरेक्टर लिहीतानाच त्यात खरेपणा आहे, नायक जब्या असेल, त्याचा मित्र पिर्‍या असेल, जब्याची आई असेल सगळेच कलाकार एकदम अस्सल आहेत. हे कलाकार नवखे आहेत असं कुठे जाणवतही नाही. या सर्व कलाकारांबरोबच आणखी एक कमाल आहे कॅमेराची...विक्रम अमलादी याचा हा कॅमेरामन म्हणून पहिलाच सिनेमा आहे हे सिेनमा बघितल्यावर खरंच वाटत नाही.

दिग्दर्शकाची दृष्टी या कॅमेरातून दिसतेच, पण प्रेक्षकांना कथेत सामील करून घेणं हे या कॅमेरामुळेच शक्य होतं. आलोकनंदा दासगुप्ता यांच्या पार्श्वसंगीतात बंगाली झाक असली तरी मराठी ग्रामीण वातावरणात ते संगीत फिट्ट बसतं आणि सिनेमाची लज्जतही वाढवतं. एकंदरित, सगळ्याच बाबतीत हा सिनेमा उत्कृष्ट झालेला आहे. मराठीत चांगले सिनेमे बनत नाहीत अशी तक्रार आता खूप झाली, आता फँड्रीसारखा सिनेमा रिलीज झालेला असताना तो आवर्जून बघून तक्रार दूर करणं एवढं तरी प्रेक्षक जरुर करू शकतात. शहरात राहून आधुनिकतेच्या गप्पा मारण्यापेक्षा समाजात नेमकं काय सुरू आहे ते डोळसपणे बघण्याची संधी 'फँड्री'ने दिलेली आहे, त्या संधीचा लाभ घेतलाच पाहिजे.

रेटिंग - 100 पैकी 100

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 15, 2014 05:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...