13 फेब्रुवारी : टोलच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्या बैठकीला सह्याद्री आतिथितीगृहात सुरूवात झाली आहे. मनसेचं टोलविषयक प्रेझेंटेशन संजय शिरोडकर यांनी सरकारसमोर सादर केलं आहे. काल मुख्यमंत्र्यांनी आमंत्रण दिल्यानुसार, राज आणिमुख्यमंत्र्यांदरम्यान ही चर्चा होतेय. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळही हजर आहेत. ज्या टोल नाक्यांवर टोल वसुली पूर्ण झालीय ते टोल नाके सरकार बंद करणार का तसंच टोल धोरणासंदर्भात काय निर्णय होतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
राज यांच्याआधी त्यांचे शिष्टमंडळ, सह्याद्रीवर पोहोचले आहेत. या शिष्टमंडळात संपादकांचाही समावेश आहे. घरून निघायच्या आधी राज यांनी पत्रकारांसोबत एक बैठक घेतली. राज ठाकरे, मुख्यमंत्री आणि संपादकांसह सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, यांच्यासह मनसेचे आमदार बाळा नांदगावकर हेदेखील बैठकीला उपस्थित आहेत.
टोलविरोधी आंदोलन करण्यासाठी मनसेने काल राज्यभर रास्ता रोको आंदोलन केले, आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या राज ठाकरेंना वाशी टोल नाक्यावर जाण्यापूर्वीच चेंबूरमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांना आरसीएफ पोलिस ठाण्यात नेण्यात आलं. आंदोलनादरम्यान राज यांना अटक झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा राज यांना चर्चेचे आमंत्रण दिले होते. राज यांनी ते निमंत्रण स्वीकारूण आणि अवघ्या 5 तासात आंदोलन मागे घण्यात आलं.
सकाळी 9वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. त्यानंतर अकराच्या सुमाराला राज वाशीच्या रस्त्यावर असताना त्यांना चेंबूर पोलिसांनी अटक केली. तिथून पोलीस त्यांना आरसीएफ पोलीस ठाण्यात घेऊन गेले, आणि एक वाजता त्यांची सुटका करण्यात आली. याच दरम्यान राज यांची मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा झाली आणि आज सकाळी भेटण्याचं निश्चित झालं.