मनसेच्या रास्तारोको 3 गुन्हे दाखल, आ.शिंदे,सांगळे अटकेत

मनसेच्या रास्तारोको 3 गुन्हे दाखल, आ.शिंदे,सांगळे अटकेत

  • Share this:

8534 mns toll 34612 फेब्रुवारी : मनसेच्या रास्ता रोको आंदोलन स्थगित झालं असलं तरी 'खळ्ळ फट्यॉक' केल्यामुळे मनसेच्या दोन आमदारांना अटक करण्यात आलीय. या आंदोलनप्रकरणी मनसेवर 3 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबईतील मेघवाडी पोलीस स्टेशनमध्ये 1 तर विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी मनसेचे आमदार शिशिर शिंदे आणि मंगेश सांगळे यांना अटक करण्यात आली आहे. मनसेच्या आंदोलनावेळी मुंबईत 8 ठिकाणी बसची तोडफोड करण्यात आल्याची माहिती आहे. आज सकाळी राज ठाकरे आंदोलनात सहभागी होण्यासाठी वाशीकडे निघाले असता पोलिसांनी त्यांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ताब्यात घेण्यात आले.

राज यांना ताब्यात घेतल्यामुळे काही ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी बसेसची तोडफोड केली. मुंबईतही 8 ठिकाणी बसेसची तोडफोड करण्यात आलीय. दुपारी सुटकेनंतर राज ठाकरे यांनी टोल आंदोलन स्थगित केलंय. उद्या सकाळी 9 वाजता राज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेटणार आहेत.

रास्ता रोको कुठे कुठे झाला ?

प्रवीण दरेकर -शालिनी ठाकरे पोलिसांच्या ताब्यात

12 फेब्रुवारी रास्ता रोको करणार, हिंमत असेल तर अडवून दाखवा असं जाहीर आव्हान राज यांनी राज्य सरकारला दिलं. त्यानुसार आज सकाळी राज्यातल्या काही टोलनाक्यांवर मनसेनं आक्रमक आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. दहिसर टोलनाक्यावर मनसे आमदार प्रवीण दरेकर, आणि शालिनी ठाकरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मोठ्या संख्येनं मनसे कार्यकर्त्यांनी सकाळी दहिसर टोलनाक्यावर आंदोलन केलं. पण पोलिसांनी मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. आणि यानंतर दहिसर टोल नाक्यावरचं आंदोलन शांत झालं. ठाण्यातल्या खारेगाव टोलनाक्यावर मनसे कार्यकर्त्यांनी रास्तारोको करून नाशिक हायवे बंद करण्याचा प्रयत्न केला. कळवा पोलिसांनी 50 आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं. जवळपास 20 मिनिटं हा रास्ता रोको सुरू होता.

वाहनांच्या चाकातील हवा सोडून रास्ता रोको

भिवंडीत मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष डी के म्हात्रे,ठाणे जिल्हाध्यक्ष सुरेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई-नाशिक महामार्गावरच्या माणकोली नाका इथं रास्ता रोको करण्यात आला. पाच कंटेनरच्या चाकांची हवा काढून रास्ता रोको करण्यात आला. त्यानंतर म्हात्रे यांच्यासह दोनशे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलं. शहरातल्या दापोडा,काल्हेरसह काही ठिकाणी पाच वाहनांची तोडफोड करण्यात आली. तर संतप्त झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी अंजूरफाटा ते वजारपट्टी नाका परिसरातली दुकानं बंद केलीत. तर तालुक्यातली कोनगाव,पडघा,कशेळी ते राहनाळ दरम्यान गावातली दुकाने बंद करण्यात आली.

भंडारा आणि गोंदिया रास्ता रोको

भंडारा आणि गोंदिया इथं मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर आले आणि त्यांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन रास्ता रोको करण्याचा प्रयत्न उधळून लावला. खबरदारीचा उपाय म्हणून सकाळपासूनच कडक बंदोबस्त लावण्यात आला होता.

नाशिकामध्ये तिन्ही आमदारांसह 450 कार्यकर्ते ताब्यात

नाशिकमध्ये मनसेच्या तिन्ही आमदारांसह 450 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मात्र, पोलिसांचं नियोजन आणि बंदोबस्त या तुलनेत नाशिकमध्ये मनसेची ताकद मात्र कमी पडली. त्यामुळे तुरळक घटना वगळता मुंबई-आग्रा महामार्गावर वाहतूक सुरळीत राहिली. मुंबई-आग्रा महामार्गावर वाडीवर्‍हेजवळ रास्ता रोको करण्याचं नाशिक मनसेचं नियोजन होतं. पण त्याआधीच जागोजागी नाकाबंदी करून पोलिसांनी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना रोखलं. पोलिसांनी अटकाव करताच महिला आघाडीने विल्होळीजवळच रास्ता रोको केला. वाडीवर्‍हे पोलिस स्टेशनमध्ये ताब्यात घेतलेल्या 50 कार्यकर्त्यांनी आणि नगरसेवकांनी धरणं धरलं. अडगावनाक्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचा पुतळा जाळला. मनमाड, चांदवड, येवला, धुळे, जळगाव याठिकाणी रास्ता रोको झालं. उत्तर महाराष्ट्रात सुमारे 500 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

सांगलीत पोलीस-मनसे कार्यकर्त्यांमध्ये झटापट

सांगली जिल्ह्यात दोन ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.यामध्ये पुणे-बंगळुरू मार्गावर आणि सांगली -इस्लामपूर हायवे मनसे कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात जोरदार झटापट झाली. दोन्ही ठिकाणच्या 80 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. या आंदोलना दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. आंदोलकांनी सरकार आणि आर आर पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

नागपुरात 80 कार्यकर्ते ताब्यात

मनसेच्या कार्यकर्त्यांनी नागपूरच्या अमरावती रोड, उमरेड रोड आणि काटोल रोड परिसरातील रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. नागपुरातून 80 मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे तर पूर्व विदर्भ संघटक हेमंत गडकरी आणि शहर प्रमुख प्रवीण बरडे यांनाही ताब्यात घेतले.

अकोल्यात शांततापूर्ण मार्गाने आंदोलन

अकोल्यामध्येही टोल विरोधी महामार्गावर शांततापूर्ण मार्गानं रास्ता रोको करण्यात आलं. मात्र काहीकाळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मनसे व मनसे विद्यार्थी सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. टोल विरोधात संतप्त प्रतिक्रिया सामान्य लोकांमध्ये दिसून आल्या होत्या.

First published: February 12, 2014, 7:10 PM IST

ताज्या बातम्या