12 फेब्रुवारी : कुठेही तोडफोड, नासधूस करू नका, सरकारला जे सांगायचं होतं ते त्यांना कळालंय. मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा झाली. उद्या सकाळी 9 वाजता सह्याद्रीवर बैठक बोलावली आहे त्या बैठकीला जाणार असून आपलं म्हणणं मांडणार आहे, त्यानंतर पुढे बघू असं स्पष्ट करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंदोलन स्थगित केलंय. लोकांना त्रास देण्याचा उद्देश नाहीय, सरकारला जे काही सांगायचं होतं ते त्यांना कळलं आहे, त्यामुळे शांतता राखा, कुठेही तोडफोड करू नका असं आवाहन राज यांनी कार्यकर्त्यांना केलंय.
टोल नाक्यांविरोधात मनसेनं 'खणखणीत' रास्ता रोको आंदोलन पुकारले होते. ठरल्याप्रमाणे आज सकाळी मनसेसैनिक रस्त्यांवर उतरले. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबादसह अन्य ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. यावेळी पोलिसांनी मनसेच्या नेत्यांसह हजारो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. खुद्द राज ठाकरे वाशी टोल नाक्यावरुन आंदोलनात सहभागी होणार होते. यासाठी सकाळी 10 च्या सुमारास ते कृष्णकुंजवरून वाशीच्या दिशेनं निघाले. मात्र राज यांच्या गाडीचा ताफा चेंबूर इथं 10.35 च्या सुमारास पोहचल्यानंतर पोलिसांनी त्यांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ताब्यात घेतलं.
राज यांना पोलीस व्हॅनमधून चेंबूर आरसीएफ स्टेशनला नेण्यात आलं. राज यांच्यासह बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांनाही ताब्यात घेण्यात आलं. राज यांना ताब्यात घेतल्याचे वृत्त पसरताच राज्यभरात संतप्त मनसैनिकांनी तोडफोडीला सुरूवात केली. औरंगाबादमध्ये चार एसटी बसेसची तोडफोड केली. तर डोंबिवली, दादर, लोअर परेल भागात मनसेच्या कार्यकर्त्यांनी दुकानं बंद पाडली. ठाण्यात जाळपोळीची घटनाही घडली. दुसरीकडे राज ठाकरे यांच्या अटकेच्या निषेधार्थ शर्मिला ठाकरे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह आरसीएफ स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन केलंय. राज्यभरात परिस्थिती हाताबाहेर जाण्याअगोदर राज यांनी पोलिसांनी सोडून दिलं. स्टेशनमध्ये असतांना राज यांचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी बोलणं झालं. स्टेशनमधून बाहेर आल्यानंतर उद्या सकाळी नऊ वाजता मुख्यमंत्र्यांनी बैठकीला बोलावलं असून आंदोलन तुर्तास मागे घेत असल्याचं जाहीर केलं. राज्यात कुठेही तोडफोड करू नका, शांतता राखा असं आवाहनही राज यांनी केलं.