11 फेब्रुवारी : हिंमत असेल तर माझ्यासमोर चर्चा करायला या, सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो, असं खुलं आव्हान सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिलं. तसंच आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे पण कायदा हातात घेऊन, आंदोलनं करून जनतेला का वेठीस धरता, असा सवालही त्यांनी केलाय. विकासकामांच्या भुमीपूजनाच्या निमित्तानं नाशिकमधल्या जानोरी या ठिकाणी भुजबळ बोलत होते.
राज ठाकरे यांच्याकडे टोल नाक्यांबाबत काय पुरावे आहे ते त्यांनी द्यावे, यासाठी त्यांनी त्यांचे पदाधिकारी असतील, अकाऊंटट असतील त्यांना आमच्याकडे पाठवावं आम्ही समोरासमोर चर्चा करायला तयार आहोत. चुक कुठे असेल तर ती दाखवा त्यावर ताबडतोब कारवाई करण्यास तयार आहे असंही भुजबळ म्हणाले. टोल विरोधा मनसेनं उद्या बुधवारी राज्यभरात रास्ता रोको आंदोलनं पुकारले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण ढवळून निघालंय.
राज यांनी पुकारलेल्या टोल आंदोलनांवर सर्वच पक्षांनी टीकास्त्र सोडले आहे. राज यांचं हे अटकेसाठी नाटक आहे अशी टीका शिवसेनेनं केली तर राज यांचं भाषण लाफ्टर शो होतं अशी खिल्ली राष्ट्रवादीने उडवलीय. पण यात छगन भुजबळ यांनी दुसर्यांदा राज यांच्यावर निशाणा साधलाय. सोमवारी दिल्लीत भुजबळ यांनी रमेश किणी हत्या प्रकरणाची आठवण करुन देत राज यांना इशारा दिला. तसंच आपल्या जीवाला राज ठाकरेंकडून धोका आहे अशी भीतीही व्यक्त केली. आज नाशिकमध्ये विकासकामाच्या वेळी भुजबळ यांनी राज यांना थेट चर्चेचं आव्हान दिलं आहे. समोरासमोर चर्चा करा चूक असेल तर तातडीने कारवाई करेल असं भुजबळ यांनी म्हटलंय. दरम्यान, राज आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन रास्ता रोको आंदोलनाबाबत भूमिका जाहीर करणार आहे त्यामुळे राज काय बोलता याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय