07 फेब्रुवारी : कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड पोलीस ठाण्यावर संतप्त जमावानं हल्ला केलाय. यामध्ये पोलिसांच्या 3 गाड्या जाळण्यात आल्या असून पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केलाय. या हल्ल्यात 10 पोलीस जखमी झाले आहेत. त्यात 4 अधिकार्यांचा समावेश आहेत.
जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी 25 राउंड फायर केलेत. शुक्रवारी चंदगडच्या एका हॉटेलमध्ये गुरुनाथ तारळेकर या वेटरवर किरकोळ कारणातून हल्ला करण्यात आला होता. मात्र आज (शनिवारी) उपचारावेळी गुरुनाथचा मृत्यू झाला. त्यानंतर गुरुनाथचं पार्थिव घेऊन संतप्त नागरिकांनी चंदगडच्या पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला.
मात्र हल्लेखोरांवर कोणतीही कारवाई न झाल्याने कारवाईच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. पण या मोर्चाला हिंसक वळण लागलं. त्यामध्ये जमावाने पोलीस स्टेशनवर तुफान दगडफेक करत पोलिसांच्या गाड्यांची जाळपोळ केलीय. यात 10 पोलीस जखमी आहेत. त्यात 4 अधिकार्यांचा समावेश आहेत. जमावापैकी अनेक जण जखमी आहेत. मात्र अधिकृत आकडा कळू शकलेला नाही. पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली आहे. मात्र अद्यापही वाढीव कुमक पोहोचू शकलेली नाही. या हल्ल्याच्या निषेधार्थ आज चंदगड शहरही बंद ठेवण्यात आलं होतं. दरम्यान, हल्ला करणारे आरोपी म्हणजेच अशोक गावडे आणि रमेश ठाकूर हे अजूनही फरार आहेत.