07 फेब्रुवारी : रिझर्व्ह बँकेने 2005 च्या आधी छापलेल्या नोटा रद्दबातल करायचा निर्णय घेतल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून मुंबईत खोट्या नोटांचा सुळसुळाट झालाय. यामुळे व्यापारी आणि व्यावसायिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय.
दादरमध्ये रेस्टारेंट चालवणारे तुषार देशमुख गेले काही दिवस चिंतेत आहेत. कारण गेल्या पंधरा दिवसांमध्ये त्यांच्याकडे येणार्या नोटांमध्ये 50 टक्क्याहून अधिक नोटा या खोट्या असल्याच दिसून येतंय. अखेर तुषार यांनी रोख ऐवजी कूपन सिस्टीम सुरू करण्याचा निर्णय घेतलाय.
रिझर्व बँकेनं 1 एप्रिलपासून 500च्या आणि हजारच्या 2005 पुर्वीच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे अनेक वर्षांपासून साठवून ठेवलेल्या नोटा अचानक बाहेर पडत आहेत. प्रत्येक जण जुन्या नोटा चलनात काढून स्वतःचा पदर झटकण्याचा प्रयत्न करत आहे.
एकीकडे खोट्या नोटांवर नियंत्रण आणण्यासाठी रिझर्व बँकेनं हा निर्णय घेतल्याचे समजतंय तर दुसरीकडे मात्र त्यापूर्वीच या खोट्या नोटांचा सुळसुळाट इतका वाढलाय. अशा काळात सर्वसामान्यांनी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.
2005 आधीच्या नोटांमध्ये सुरक्षेची चिन्हं कमी आहेत. म्हणून पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणात खोट्या नोटा भारतात आल्या आहेत. त्या नोटांना बाहेर काढण्यासाठी रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतलाय. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात काळा पैसाही आता बाजारात खुळखुळू लागलाय. त्यापासून 31 मार्चपर्यंत सर्वांनाच सावध राहवं लागणार आहे. कारण 1 एप्रिलपासून या जुन्या नोट म्हणजे निव्वळ कागदाचे तुकडेच असणार आहेत.
खोट्या नोटा कशा ओळखायच्या ?
- 2005 च्या आधी छापलेल्या सर्व नोटा 1 एप्रिल 2014 पासून रिझर्व्ह बँक परत घेणार आहे
- या नोटा बदलण्याची घाई नाही, पण त्या बदलून घेणं जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाचं कर्तव्य
-2005 नंतर छापलेल्या सर्व नोटांच्या तळाशी छपाईचे साल नमूद केलेले असते
-तुम्ही कोणत्याही बँकेत जाऊन जुन्या नोटांच्या बदल्यात नव्या नोटा घेऊ शकतात
- तुम्ही कायदा पाळणारे नागरिक असाल, तर घाबरण्याचे कोणतेही कारण नाही
- तुम्ही कितीही नोटा बदलून घेऊ शकतात