मोदींच्या भेटीची बातमी चुकीची - शरद पवार

  • Share this:

Image img_237972_sharadpawaronlbt_240x180.jpg31 जानेवारी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची भेट झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. पण नरेंद्र मोदींशी आपली भेट झालेली नाही, ही बातमी पूर्णपणे खोडसाळ, आधारहिन आणि चुकीची आहे असं शरद पवार यांनी स्पष्ट केलंय.

पण आयबीएन लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीचे नेते भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती मिळालीये. त्यामुळे संशयाचं वातारवण निर्माण करून राष्ट्रवादी आता काँग्रेसवर दबाव आणत असल्याचं म्हटलं जात आहे. अशातच राष्ट्रीय प्रवक्ते डी. पी. त्रिपाठी यांनी राष्ट्रवादीसाठी सर्व पर्याय खुले आहेत, असं वक्तव्य करत पुन्हा संभ्रम निर्माण केला आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी नरेंद्र मोदींची बाजू घेतली होती.

राहुल गांधी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत 2002 च्या दंगलीप्रकरणी राहुल यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली होती. पण यूपीएचा मित्रपक्ष राष्ट्रवादीने मोदींची बाजू घेतल्यामुळे वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली होती. भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी आयबीएन लोकमतला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादीच्या भूमिकेचं स्वागत केलं होतं पण राष्ट्रवादीला प्रवेश नाही असं स्पष्ट मत मुंडेंनी मांडलं होतं. त्यातच पवार यांनी मोदींची भेट घेतल्याच्या बातमीमुळे खळबळ उडालीय. दरम्यान, तर, राष्ट्रवादी महायुतीत आली तर स्वाभिमानी पार्टीला वेगळा विचार करावा लागले असे संकेत खासदार राजू शेट्टी यांनी काही वेळापूर्वीच आयबीएन लोकमतशी बोलताना स्पष्ट केलं.

शरद पवार यांचं स्पष्टीकरण

"एका वृत्तपत्रात आलेली, मी नरेंद्र मोदी यांना 17 जानेवारीला नवी दिल्लीत भेटलो, ही बातमी, पूर्णपणे खोडसाळ, आधारहिन आणि चुकीची आहे. राज्यांच्या भेटीदरम्यान किंवा दिल्लीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या परिषदेदरम्यान, मी मुख्यमंत्र्यांना भेटत असतो आणि हे प्रसंग सोडले तर मी गेल्या एका वर्षभरात मोदींना कधीही भेटलेलो नाही."

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 31, 2014 03:42 PM IST

ताज्या बातम्या