'राज'आज्ञेनंतर राज्यभरात टोल'फोड'

'राज'आज्ञेनंतर राज्यभरात टोल'फोड'

  • Share this:

toll27 जानेवारी : जोपर्यंत टोल कशासाठी वसूल होतो हे सांगत नाही तोपर्यंत राज्यभरात कुठेही टोल भरू नका, तुम्हाला कोणी टोल भरण्यासाठी अडवलं तर त्याला तुडवा, ट्रॅफिक जॅम झाली तर होऊ द्या, काही झाले तरी चालले पण टोल भरु नका असा आदेश मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेसैनिकांनी दिली. आणि राज यांनी आदेश देऊ काही तास होत नाही तेच मनसेसैनिकांनी टोलनाक्यांवर हल्लाबोल केलाय. संपूर्ण मुंबईसह पुणे, नाशिक, नागपूर, परभणी, औरंगाबादमध्ये मनसैनिकांनी टोलनाके फोडून काढले आहे.

राज यांच्या आदेशानंतर मनसैनिकांनी ठाण्यातील आनंद नगर आणि ऐरोलीच्या टोलनाक्यांची पहिली तोडफोड केली. त्यानंतर हे लोण हा हा म्हणता राज्यभर पसरले आहे. सध्या राज्यभरात टोलविरोधात जनक्षोभ पसरला आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतल्या वाशीमध्ये मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे रविवारी उद्घाटनाच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा टोलचा विषय काढला.या अगोदरही मनसेनं टोलविरोधात आंदोलन पुकारले होते. आता निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा मनसेनं टोल'फोड' सुरू केलीय.

कल्याणमध्ये टोल जाळला

कल्याणमध्ये मनसेच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी कल्याण-भिवंडी रोडवर कोन गावात टोल नाका जाळून टाकला. रविवारी रात्री अडीचच्या सुमाराला ही घटना घडली. मनसेचे आमदार प्रकाश भोईर यांच्या नेतृत्वाखाली कोन टोल नाक्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. विशेष म्हणजे या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारची नोंद करण्यात आलेली नाही.

प्रवीण दरेकरांसह कार्यकर्त्यांना अटक

मनसे कार्यकर्त्यांनी मुलुंड टोलनाक्याजवळ आज सोमवारी सकाळी आंदोलन केलं. यावेळी मनसेच्या 10 कार्यकर्त्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं. दहिसर टोल नाक्यावर मनसे आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करुन परिसर दणाणून सोडला. पोलिसांनी प्रवीण दरेकर आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. त्यामुळे इथं पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून टोल वसुली सुरू आहे. तर मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर खालापूर टोल नाक्यावरही मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी सुमारे 100 मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

नाशिकमध्ये टोल पाडला बंद

नाशिकमध्ये माडसांगवी आणि धाकांबे टोलनाक्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आणि टोल बंद पाडला. यावेळी नाशिक पोलिसांनी 12 जणांना ताब्यात घेतलं आणि नंतर सोडून दिलं. नंतर पोलीस बंदोबस्तात टोलवसुली पूर्ववत सुरू झाली.

परभणी- नागपूरमध्ये टोल'फोड'

परभणीत गंगाखेड रस्त्यावर असलेल्या एकमेव टोल नाक्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आणि अनेक वाहनं टोल न भरता सोडून दिली. कार्यकर्त्यांनी टोलनाक्याची तोडफोड केली यानंतर पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना अटक केली आणि सोडून दिलं. तर नागपूर येथील हिंगणा रोडवर रविवारी रात्री टोल नाक्याची तोडफोड केली.

पुण्यात रिलायन्सचे कार्यालय फोडले

पुण्यातही मनसे कार्यकर्त्यांनी टोल नाक्यावर तोडफोड केली. कार्यकर्त्यांनी चांदणी चौकातला टोल नाका फोडला. रविवारी रात्री अकरा वाजता ही तोडफोड झाली. आज सोमवारी सकाळी हिंजवडी पोलिसांनी 5 ते 6 मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. तर मनसेच्या महिला कार्यक र्त्यांनी मांजरीचा टोल नाका फोडून काढला. आयआरबीचा या टोल नाक्यावर मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी काही महिला कार्यकर्त्यांना लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतण्यात आले आहे. तर आज दुपारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातलं रिलायन्सचं ऑफिस फोडलं. पुणे- सातारा सहापदरिकरणाचं काम रिलायन्सकडे असल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी ऑफिसवर हल्ला केला. कार्यकर्त्यांनी संपूर्ण ऑफिसची जोरदार तोडफोड केली. संपूर्ण सामानाची नासधूस केली.

औरंगाबादमध्ये रात्री तोडफोड सकाळी टोल सुरू

तर औरंगाबाद-जालना रोडवरील करमाडजवळ टोलनाक्यावरही रविवारी रात्री मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. कार्यकर्त्यांनी टोलनाक्यावर दगडफेक करून संगणक आणि काचा फोडल्या. या हल्लेखोरांनी तोंडाला रूमाल बांधून रात्री साडे दहाच्या आसपास हा हल्ला केला. करमाड पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. तोडफोडीच्या घटनेनंतर पोलिसांच्या बंदोबस्तात आज टोलनाका सुरळीत सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 27, 2014 03:42 PM IST

ताज्या बातम्या