23 जानेवारी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. त्यानिमित्ताने सायनमधल्या सोमय्या मैदानात आज दुपारी शिवसेनेची 'प्रतिज्ञा दिन' सभा होतेय. या सभेला येणारे सर्व शिवसैनिक आपल्या हातावर शिवबंधन धागा बांधून घेणार आहेत.
काल शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी शिवसेना भवनात शिवबंधन धाग्याची पूजा केली होती, त्यानंतर ते शिवबंधन बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाजवळ ठेवण्यात आलं आहे. खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज या शिवबंधन धाग्याचं वाटप करणार आहेत. त्यानंतर हे धागे घेऊन राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यातले नेते आपापल्या भागात शिवसैनिकांना हे धागे बांधणार आहेत. या शिवबंधनाच्या कार्यक्रमाची शिवसेनेने जय्यत तयारी केलीय. या सभेला राज्यभरातून शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत.
येणार्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच शिवसेनेनं शिवसैनिकांना पक्षात बांधून ठेवण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केल्याची चर्चा आहे. या सभेत दुपारी अडीचच्या सुमारास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाषण करतील.
दरम्यान, शिवसेनेच्या इतिहासात शिवाजी पार्काचं विशेष महत्त्व आहे. तिथं जमून राज्यभरातून शिवसैनिक बाळासाहेबांच्या चौथर्याला आदरांजली वाहताहेत.
शिवसेनेची हेल्पलाईन
बाळासाहेबांच्या जन्मदिनानिमित्त शिवसेनेची हेल्पलाईन सुरु करण्यात येणार आहे. 1800228595 या टोल फ्री क्रमांकावर आपणं आपल्या तक्रारींची नोंद करू शकता. आलेल्या तक्रारींची दखल खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार असल्याचा दावा शिवसेने करत आहे.