22 जानेवारी : कोल्हापूरपाठोपाठ सोलापूर-सांगलीतही टोलविरोधी आंदोलनाचं लोण पसरलंय. सोलापूरमध्ये टोलवसुली बंद करण्याची मागणी करत बसपच्या कार्यकर्त्यांनी बार्शी- देगाव टोलनाक्यावर घोषणाबाजी केली तर सांगलीत सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीतर्फे आज बंदचं आयोजन करण्यात आलंय. बंदला पाठिंबा देत सांगली शहरातली सगळी दुकानं, भाजी मार्केट आणि बाजारपेठ आज बंद आहे. सांगलीतल्या टोलविरोधी आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. सांगलीवाडी टोलनाक्यावरची टोलवसुली आजही बंद आहे. सात कोटींच्या कामासाठी गेली 16 वर्षं सांगली- इस्लामपूर रस्त्यावर टोलवसुली सुरूच आहे. गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यातच टोलची मुदत संपलीय. तरीही टोलवसुली सुरूच असल्याने सांगलीकर संतप्त झालेत. आत्तापर्यंत सुमारे 65 कोटी रुपये टोलवसुली होऊनही सांगलीकरांना भुर्दंड का असा सवाल सांगलीकर विचारतायत.
कोल्हापूर महापालिकेनं टोलचे पैसे देणार नसल्याचा ठाराव केल्याचं वक्तव्य कोल्हापूरचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काल इंदापूरमध्ये केलं होतं. पाटील यांच्या या वक्तव्यानं कोल्हापूर टोल प्रकरणाचा गुंता आणखीच वाढलाय. कोल्हापूरमध्ये आंदोलन पेटलेलं असताना सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी मध्यस्थी करून आय.आर.बी. कंपनीचे सगळे पैसे महापालिका देणार,असं जाहीर केलं होतं. हे पैसे देण्याआधी रस्ते प्रकल्पाचं ऑडिट करा, अशी मागणीही महापालिकेनं केली होती. त्यानंतर आंदोलन मागेही घेण्यात आलं होतं. आता पालकमंत्र्यांनीच असं वक्तव्य केल्यानं ठेकेदारांचे पैसे देणार कोण, असा प्रश्न निर्माण झालाय.
दरम्यान, मुंबई टोलमुक्त करा हा मागणी जोर धरू लागली आहे. या संदर्भात मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. त्यात त्यांनी मुंबईमध्ये असलेला टोल काढून टाका, अशी मागणी केली. मुंबईतल्या रस्त्यांसाठी आम्ही मुंबईकरांकडून एक रुपयाही घेत नाही, हायवे MSRDC कडे आहेत. मग शहरातल्या उड्डाणपुलांचा बोजा मुंबईकरांवर का टाकायचा, असा सवाल शेवाळेंनी त्यांच्या या पत्रात विचारलाय.