प्रा.हातेकरांचं निलंबन मागे

प्रा.हातेकरांचं निलंबन मागे

  • Share this:

hatekar19 जानेवारी :  विद्यार्थ्यांसह सर्व स्तरावरून प्रा.डॉ. नीरज हातेकरांना मिळणारा पाठिंबा लक्षात घेता मुंबई विद्यापीठाने त्यांचं निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलची काल रात्री 9 तास मॅरेथॉन बैठक झाली. त्यानंतर मध्यरात्री 3 वाजता विद्यापीठाने प्रसिद्धीपत्रक काढून हातेकरांचे निलंबन मागे घेण्याची शिफारस मंजूर झाल्याचे जाहीर केले. हा विद्यार्थ्यांचा विजय असल्याचं प्रा. हातेकर यांनी सांगितलं. प्राध्यापकांनी एकमेकांच्या पाठीशी उभं राहायला हवं. तुम्ही चांगल्या गोष्टींसाठी लढत असाल तर समाज तुमच्या पाठीशी उभा राहिलच याची खात्री या प्रकरणानं पटली असंही डॉ. हातेकर पुढे म्हणाले.

डॉ.नीरज हातेकर यांची विभागीय चौकशी त्वरित सुरू करण्याचा निर्णयही घेण्यात आला. नैसर्गिक न्याय देण्यासाठी हातेकरांची बाजू समजून घेऊन मग कारवाईची दिशा ठरवली जाईल. हातेकर यांनी उपस्थित केलेल्या 16 मुद्द्यांची चौकशी केली जाणार आहे. या मुद्द्यांमध्ये काहीही तथ्य नाही, पण विद्यार्थी आणि विद्यापीठाचं हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं विद्यापीठानं म्हटलंय.

माजी न्यायाधीश डी.जी. देशपांडे यांची चौकशी समिती नेमून संपूर्ण चौकशी केली जाणार आहे. राज्यपालांच्या आदेशानंतर कुलगुरूंना शहाणपण सुचलं असं म्हणावं लागतंय. विद्यापीठाचा हा निर्णय म्हणजे विद्यार्थी आणि डॉ. हातेकरांचा विजय असल्याचं मानलं जातंय. आयबीएन लोकमतनंही हे प्रकरण लावून धरलं होतं. कालही मुंबई विद्यापीठाच्या कलीना कॅम्पसबाहेर एक जंगी सभा घेण्यात आली होती. उद्या विद्यार्थी ठरल्याप्रमाणे लाक्षणिक उपोषण करणार आहेत. हातेकरांनी उपस्थित केलेल्या 16 मुद्द्यांची चौकशी करावी या मागणीसाठी हे उपोषण करण्यात येणार आहे. यासाठी स्टुडंट जॉइंट ऍक्शन फ्रंट नावाने विद्यार्थी एकत्र आले आहेत.

विद्यापीठाची भूमिका

व्यवस्थापन परिषदेच्या 20 डिसेंबर 2013 रोजी झालेल्या सभेमध्ये व्यवस्थापन परिषदेने डॉ. हातेकरांविषयी घेतलेला निर्णय आणि कुलगुरूंनी त्यावर केलेली कारवाई योग्य होती असे व्यवस्थापन परिषदेच्या आजच्या सभेतील उपस्थित सदस्यांनी ठामपणे एकमताने मांडले.

डॉ. हातेकरांनी उपस्थित केलेल्या 16 मुद्द्यांमध्ये तथ्य नसताना संस्था, विद्यार्थीहित आणि लोकभावनांचा विचार करून, अन्याय झाल्याची भावना दूर करण्यासाठी, डॉ. नीरज हातेकर यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात यावी अशी शिफारस करण्यात येत आहे.

डॉ. हातेकरांनी यांच्यावर विभागीय चौकशी त्वरित सुरू करावी. चौकशी अधिकारी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश श्री. हातेकर यांना आपली संपूर्ण बाजू मांडण्याची संधी द्यावी अशी शिफारस करण्यात आली. ही विभागीय चौकशी कालबद्ध पध्दतीने पूर्ण करावी अशीही शिफारस करण्यात आली.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 19, 2014 11:54 AM IST

ताज्या बातम्या