नामदेव ढसाळांना अखेरचा निरोप

नामदेव ढसाळांना अखेरचा निरोप

 • Share this:

256323 namdev dhasal4516 जानेवारी : ज्येष्ठ कवी, विचारवंत आणि दलित पँथरचे संस्थापक पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या पार्थिवावर गुरूवारी संध्याकाळी दादरच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. आधी बुद्धवंदना झाली आणि त्यानंतर संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

वडाळ्याच्या आंबेडकर कॉलेजमध्ये सकाळी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. यावेळी हजारो जणांनी त्यांचं दर्शन घेतलं. त्यानंतर दुपारी अंत्ययात्रा निघाली. या अंत्ययात्रेत राजकीय नेते, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

येत्या 24 जानेवारीला संध्याकाळी 7 वाजता वडाळ्यातल्या आंबेडकर कॉलेजमध्येच शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कँन्सरशी झुंज देणारे नामदेव ढसाळ यांनी बुधवारी पहाटे 4 वाजता बॉम्बे हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. साहित्य जगतातला धगधगता निखारा आणि चळवळीतला पँथर आज कायमचा विसावलाय.

“रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो…”रक्तात पेटलेल्या अगणित सुर्याना हाकारत अंधारयात्रिक होण्याचं ठामपणे नाकारणारा बंडखोर कवी म्हणजे नामदेव ढसाळ. ढसाळ म्हणजे जातीयवादाचे लचके तोडण्यासाठी सर्वशक्तीनिशी झेपावलेला पँथर…केवळ मराठीच नाही तर जागतिक साहित्य विश्वावर आपली शैलीदार मोहोर उठवणार्‍या या कवीचा जन्म 1949 च्या फेब्रुवारीत पुण्याजवळच्या एका खेड्यात झाला. दलित कुटुंबात जन्मलेल्या ढसाळांचं बालपण मुंबईतल्या गोलपिठा या वेश्यावस्तीत गेलं. लुंपेनवर्गाच्या समाजात ढसाळांचं बालपण अत्यंत हालाखीच्या स्थितीत गेलं.

मुंबईतल्या वेश्यावस्तीतलं बकालपण, नाकारलेपण आणि उध्वस्तपणाचा उद्रेक घेऊन नामदेव ढसाळांचा गोलपिठा हा धगधगीत काव्यसंग्रह मराठी साहित्यात अवतरला आणि त्यानं मराठी विश्वाला धक्का दिला. मराठी काव्याचे मापदंड बदलून टाकले. प्रस्थापित साहित्यप्रांतात दलित आणि लुंपेनवर्गाची जळजळीत, बंडखोर भाषा नव्यानं दाखल झाली आणि मराठी साहित्य विश्वाला नाकारलं गेलेल्या जगाचं प्रतिनिधीत्व कऱणारा ढसाळांच्या रुपात बंडखोर कवी मिळाला.

गोलपिठानंतर ढसाळांचे ‘मुर्ख म्हातार्‍याने डोंगर हलवले’, ‘आंबेडकरी चळवळ’, ‘तुही यंता कंची’, ‘खेळ’, ‘प्रियदर्शिनी’, ‘या सत्तेत जीव रमत नाही’, ‘गांडू बगीचा’, ‘मी मारले सुर्याच्या रथाचे सात घोडे’, ‘तुझे बोट धरून मी चाललो आहे’ असे काव्यसंग्रह येत गेले आणि ढसाळांची असामान्य प्रतिभा जगाला परिचित होऊ लागली. ढसाळांच्या कवितांचं अनेक परदेशी भाषांमध्येही भाषांतर कऱण्यात आलं.

नामदेव ढसाळ यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून ज्या प्रमाणं बंड करायला सुरू केलं, त्याच काळात कविता हे राजकारणच आहे असं म्हणत ढसाळ यांनी 1973 ला अमेरिकेतल्या ब्लॅक पँथरच्या धर्तीवर दलित पँथर ही क्रांतीकारी संघटना स्थापन केली. दलितांवरच्या वाढत्या अत्याचाराचा मुकाबला करण्यासाठी दलित चळवळ प्रभावी ठरत नाही त्यासाठी क्रांतीकारी चळवळ उभारण्याच्या दृष्टीनं ढसाळांनी हे पाऊल उचललं. ही तरुणांची चळवळ होती. जिथं जिथं दलितांवर अत्याचार होत होता, तिथं तिथं ही संघटना संघर्षासाठी धावून जात होती.

रस्त्यावर उतरून संघर्ष करणं आणि अत्याचाराला विरोध करणं हे दलित पँथरचं वैशिष्ठ्य. 70 आणि 80 च्या दशकात महाराष्ट्राच्या राजकाराणात आणि सामाजिक जीवनात मोठी खळबळ उडवून देणार्‍या या चळवळीनं मोठा दबदबा निर्माण केला. पण पुढं या चळवळीत अनेक कारणानं फुट पडली. चळवळीचा नेता म्हणून ढसाळांनी अनेक धक्कादायक निर्णय घेतले. ढसाळांनी सामाजिक, राजकीय जीवनात काहीही निर्णय घेतले असतील पण त्याचं सामाजिक चळवळ आणि साहित्य प्रांतातलं स्थान कायम आबाधित राहिल.

ढसाळांना लाभलेले पुरस्कार

 • महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार
 • सोविएट लँड नेहरू ऍवॉर्ड – (1974)
 • पद्मश्री (1999)
 • साहित्य अकादमीचा गोल्डन लाईफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार ( 2004 )

हा पुरस्कार प्राप्त करणारे ढसाळ देशातले एकमेव कवी आहेत.

ढसाळांचे काव्यसंग्रह

 • गोलपिठा ( 1973 )
 • मुर्ख म्हातार्‍याने डोंगर हलवले ( 1975)
 • आंबेडकरी चळवळ ( 1981)
 • तुही यंता कंची ( 1981)
 • खेळ ( 1983)
 • प्रियदर्शिनी ( 1976)
 • या सत्तेत जीव रमत नाही ( 1995)
 • गांडू बगीचा ( 1986)
 • मी मारले सुर्याच्या रथाचे सात घोडे ( 2005)
 • तुझे बोट धरून मी चाललो आहे ( 2006)

ढसाळांचं लिखाण

 • आंधळे शतक
 • हाडकी हाडवळा
 • उजेडाची काळी दुनिया
 • सर्व काही समष्टीसाठी ( सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून त्यांनी सर्वकाही समष्टीसाठी हा स्तंभ ही चालवला )
 • बुद्ध धर्म : काही शेष प्रश्न.
 • सत्यता या साप्ताहिकाचे संपादक म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय.

First published: January 16, 2014, 7:38 PM IST

ताज्या बातम्या