महाकवी हरपला, नामदेव ढसाळ यांचं निधन

महाकवी हरपला, नामदेव ढसाळ यांचं निधन

 • Share this:

Image img_185972_namdevdhsal_240x180.jpg15 जानेवारी : दलित पँथरचे संस्थापक आणि ज्येष्ठ कवी, विचारवंत पद्मश्री नामदेव ढसाळ यांचं आज (बुधवारी) पहाटे निधन झालं. ते 64 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून नामदेव ढसाळ कॅन्सरशी झुंज देत होते. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते मंगळवारी रात्री त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान ढसाळ यांची प्राणज्योत मालवली.

दलित तरुणांवर आणि महिलांवर होत असलेल्या अन्यायाचा सामना करण्यासाठी, त्याला रोखण्यासाठी अमेरिकेतल्या ब्लॅक पँथरची प्रेरणा घेऊन 1972 साली त्यांनी दलित पँथरची स्थापना केली. महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात ढसाळांचं स्थान फार महत्वाचं होतं.

दलित तरुणांच्या मनातली धगधग एका संघटनेच्या माध्यमातून व्यक्त करण्यात ढसाळ यांचा सिंहाचा वाटा होता. ढसाळ यांचे अनेक काव्यसंग्रह प्रकाशित झाले. गोलपीठा हा त्यांचा काव्यसंग्रह खूप गाजला. त्यांची अनेक पुस्तकंही गाजली. त्यांचं पार्थिव उद्या सकाळी 11 वाजल्यापासून मुंबईतल्या वडाळामधल्या आंबेडकर कॉलेजमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल. उद्या दुपारी 1 वाजता दादरमधल्या चैत्यभूमीत त्यांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे.

"रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो..."रक्तात पेटलेल्या अगणित सुर्याना हाकारत अंधारयात्रिक होण्याचं ठामपणे नाकारणारा बंडखोर कवी म्हणजे नामदेव ढसाळ. ढसाळ म्हणजे जातीयवादाचे लचके तोडण्यासाठी सर्वशक्तीनिशी झेपावलेला पँथर...केवळ मराठीच नाही तर जागतिक साहित्य विश्वावर आपली शैलीदार मोहोर उठवणार्‍या या कवीचा जन्म 1949 च्या फेब्रुवारीत पुण्याजवळच्या एका खेड्यात झाला. दलित कुटुंबात जन्मलेल्या ढसाळांचं बालपण मुंबईतल्या गोलपिठा या वेश्यावस्तीत गेलं. लुंपेनवर्गाच्या समाजात ढसाळांचं बालपण अत्यंत हालाखीच्या स्थितीत गेलं.

मुंबईतल्या वेश्यावस्तीतलं बकालपण, नाकारलेपण आणि उध्वस्तपणाचा उद्रेक घेऊन नामदेव ढसाळांचा गोलपिठा हा धगधगीत काव्यसंग्रह मराठी साहित्यात अवतरला आणि त्यानं मराठी विश्वाला धक्का दिला. मराठी काव्याचे मापदंड बदलून टाकले. प्रस्थापित साहित्यप्रांतात दलित आणि लुंपेनवर्गाची जळजळीत, बंडखोर भाषा नव्यानं दाखल झाली आणि मराठी साहित्य विश्वाला नाकारलं गेलेल्या जगाचं प्रतिनिधीत्व कऱणारा ढसाळांच्या रुपात बंडखोर कवी मिळाला.

गोलपिठानंतर ढसाळांचे 'मुर्ख म्हातार्‍याने डोंगर हलवले', 'आंबेडकरी चळवळ', 'तुही यंता कंची', 'खेळ', 'प्रियदर्शिनी', 'या सत्तेत जीव रमत नाही', 'गांडू बगीचा', 'मी मारले सुर्याच्या रथाचे सात घोडे', 'तुझे बोट धरून मी चाललो आहे' असे काव्यसंग्रह येत गेले आणि ढसाळांची असामान्य प्रतिभा जगाला परिचित होऊ लागली. ढसाळांच्या कवितांचं अनेक परदेशी भाषांमध्येही भाषांतर कऱण्यात आलं.

नामदेव ढसाळ यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून ज्या प्रमाणं बंड करायला सुरू केलं, त्याच काळात कविता हे राजकारणच आहे असं म्हणत ढसाळ यांनी 1973 ला अमेरिकेतल्या ब्लॅक पँथरच्या धर्तीवर दलित पँथर ही क्रांतीकारी संघटना स्थापन केली. दलितांवरच्या वाढत्या अत्याचाराचा मुकाबला करण्यासाठी दलित चळवळ प्रभावी ठरत नाही त्यासाठी क्रांतीकारी चळवळ उभारण्याच्या दृष्टीनं ढसाळांनी हे पाऊल उचललं. ही तरुणांची चळवळ होती. जिथं जिथं दलितांवर अत्याचार होत होता, तिथं तिथं ही संघटना संघर्षासाठी धावून जात होती.

रस्त्यावर उतरून संघर्ष करणं आणि अत्याचाराला विरोध करणं हे दलित पँथरचं वैशिष्ठ्य. 70 आणि 80 च्या दशकात महाराष्ट्राच्या राजकाराणात आणि सामाजिक जीवनात मोठी खळबळ उडवून देणार्‍या या चळवळीनं मोठा दबदबा निर्माण केला. पण पुढं या चळवळीत अनेक कारणानं फुट पडली. चळवळीचा नेता म्हणून ढसाळांनी अनेक धक्कादायक निर्णय घेतले. ढसाळांनी सामाजिक, राजकीय जीवनात काहीही निर्णय घेतले असतील पण त्याचं सामाजिक चळवळ आणि साहित्य प्रांतातलं स्थान कायम आबाधित राहिल.

नामदेव ढसाळ यांचा अल्पपरीचय

जन्म - 14 फेब्रुवारी 1949 पुण्याजवळ एका गावात झाला.

दलित कुटुंबात जन्म झालेल्या ढसाळांचं बालपण गरीबीत गेलं.

त्यांचं बालपण गोलपिठा या मुंबईतल्या वेश्यावस्तीत गेलं.

त्यांचे वडील खाटिकाचा व्यवसाय करत होते.

शाहीर अमर शेखांची मुलगी मल्किका अमरशेख यांच्याशी ढसाळांचं लग्न झालं.

1972 मध्ये त्यांनी अमेरिकेतल्या ब्लॅक पँथरची प्रेरणा घेऊन दलित पँथरची स्थापना केली.

1973 मध्ये त्यांनी गोलपिठा हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित केला.

ढसाळांना लाभलेले पुरस्कार

 • महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार
 • सोविएट लँड नेहरू ऍवॉर्ड - (1974)
 • पद्मश्री (1999)
 • साहित्य अकादमीचा गोल्डन लाईफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार ( 2004 )

हा पुरस्कार प्राप्त करणारे ढसाळ देशातले एकमेव कवी आहेत.

ढसाळांचे काव्यसंग्रह

 • गोलपिठा ( 1973 )
 • मुर्ख म्हातार्‍याने डोंगर हलवले ( 1975)
 • आंबेडकरी चळवळ ( 1981)
 • तुही यंता कंची ( 1981)
 • खेळ ( 1983)
 • प्रियदर्शिनी ( 1976)
 • या सत्तेत जीव रमत नाही ( 1995)
 • गांडू बगीचा ( 1986)
 • मी मारले सुर्याच्या रथाचे सात घोडे ( 2005)
 • तुझे बोट धरून मी चाललो आहे ( 2006)

ढसाळांचं लिखाण

 • आंधळे शतक
 • हाडकी हाडवळा
 • उजेडाची काळी दुनिया
 • सर्व काही समष्टीसाठी ( सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून त्यांनी सर्वकाही समष्टीसाठी हा स्तंभ ही चालवला )
 • बुद्ध धर्म : काही शेष प्रश्न.
 • सत्यता या साप्ताहिकाचे संपादक म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय.

First published: January 15, 2014, 8:16 AM IST

ताज्या बातम्या