09 जानेवारी : मनसे महाराष्ट्राचा 'बाप' आहे तर राष्ट्रवादी माय आहे असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज यांना लगावला. राष्ट्रवादी पक्ष स्वत:ला कधी बाप समजत नाही. आमची भूमिका आईसारखी आहे. महाराष्ट्रातील जनताही आमचं कुटुंब आहे असं स्पष्टीकरणही मलिक यांनी दिलं.
तर नरेंद्र मोदी यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आपली प्रतिमा झाकली जात असं काही लोकांना वाटत आहे. त्यामुळे राज यांच्या पोटात दुखायला लागलंय. त्यांनी अगोदर नरेंद्र मोदींची भाषणं ऐकावीत आणि मग टीका करावी असं प्रतिउत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.
तसंच मुख्यमंत्री असूनही मोदींनी देशांच्या नेतृत्वाची धुरा सांभाळत आहे. देशभरात प्रचार करत आहे. लाखो लोकं त्यांना ऐकायला येत आहे. त्यामुळे मोदींनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा असा सल्ला कुणी देण्याची गरज नाही असंही फडणवीस म्हणाले.
आज नाशिकमध्ये मनसेची बैठक झाली यावेळी अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन चौफेर टीका केली. आपल्या जाहीर सभेत नरेंद्र मोदींच्या कार्याचा पाढा वाचायचे मात्र आज त्यांनी मोदींवरच टीकास्त्र सोडले. भाजपच्या पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांनी निवड झाल्यानंतर त्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला हवा होता. पंतप्रधानपदाचा उमेदवार असणार्या व्यक्तीनं फक्त आपल्या राज्यापुरता विचार करणं योग्य नाही असा सल्लावजा टोला राज ठाकरे यांनी लगावलाय.