09 जानेवारी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महत्त्वाची बैठक राज ठाकरे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये होणार आहे. लोकसभा लढवण्याच्या दृष्टीने मनसेची तयारी आणि ताकद आहे का याची चाचपणी या बैठकीत केली जाणार आहे. या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मनसेचे राज्यभरातील पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधीही नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्याशी तीन सत्रात विभागवार चर्चा करणार आहेत.
आगामी निवडणुकींच्या अनुषंगाने काही प्रमाणात मनसेचीही तयारी सुरू झाली आहे. इतर पक्षाच्या जागावाटप किंवा जागांची चाचपणी सुरू असल्याने यंदा मनसे किती मतदारसंघात लढणार यांसह उमेदवारांची नावे, पक्षाचे धोरण याबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.
गेल्यावेळच्या लोकसभा निवडणुकीसह विधानसभा निवडणुकीत मनसेने केलेल्या कामगिरीमुळे यावेळेस इतर पक्षांचेही मनसेच्या भूमिकेकडे लक्ष आहे.