08 जानेवारी : मुंबईहून डेहराडूनकडे निघालेल्या मुंबई-डेहराडून एक्स्प्रेसला ठाण्याजवळ आज पहाटे अडीच ते साडे तीनच्या दरम्यान आग लागली. या आगीत 9 जणांचा मृत्यू झालाय. या आगीत गाडीचे दोन डबे पूर्णपणे जळून खाक झालेत.
या गाडीच्या तीन कोच एस 1, एस 2 आणि एस 3 या तीन स्लीपर कोचमध्ये ही आग लागली. थंडी असल्यामुळे प्रवाशांनी खिडक्या बंद केल्या होत्या. त्यामुळे आगीचा धूर बाहेर जाणं कठीण जात होतं. त्यामुळेच गुदमरुन प्रवाशांचा मृत्यू झाला. घटनेच्या ठिकाणापासून गुजरातची सीमाजवळ असल्यामुळे गुजरात अग्निशमन दलाच्या काही गाड्याही घटनास्थळी पोहोचल्या. आगीचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही.
मृतांपैकी दोघांची ओळख पटलीय. दीपिका शाह आणि देवशंकर उपाध्याय अशी त्यांची नावं आहेत. रेल्वे विभागाकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आलीय. एक्स्प्रेस ट्रेनला आग लागण्याची गेल्या महिनाभरातील ही दुसरी घटना आहे. आंध्रप्रदेशमध्ये बंगळुरू नांदेड एक्स्प्रेसला लागलेल्या आगीत 26 जणांचा बळी गेला होता.
रेल्वे प्रशासनाकडून मदतीसाठी 022-23011853, 022-23007388 या क्रमांकांवर संपर्क साधू शकता.