'स्वाभिमानी'ची महायुतीशी हातमिळवणी

'स्वाभिमानी'ची महायुतीशी हातमिळवणी

  • Share this:

mahayuti34523407 जानेवारी : पश्चिम महाराष्ट्रात शेतकर्‍यांच्या प्रश्नावर लढणारी स्वाभिमानी शेतकरी संघटना आता महायुतीत दाखल झालीय. 'स्वाभिमानी' शिवसेनेत दाखल झाली याबद्दलची घोषणा भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली. लोकसभा, विधानसभा निवडणूक एकत्रित लढवणार आहे. तसंच स्वामीनाथन आणि रंगनाथन समितीच्या शिफारसी स्वीकारण्याची स्वाभिमानीची अट मान्य करण्यात आली असून त्याबरोबरच राज्यात दुष्काळ धोरण राबवणार असल्याची अटसुद्धा मान्य करण्यात आलीय या अटी मान्य झाल्यानंतर स्वाभिमानीने महायुतीशी हातमिळवणी केलीय. आता शिवसेना, भाजप, रिपाइं आणि 'स्वाभिमानी'अशी मिळून 'स्वाभिमानी' महायुती झालीय.

आम आदमी सोबत चर्चा बिनसल्यानंतर आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी मातोश्रीवर दाखल झाले होते. पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेनं पाठिंबा द्यावा या मागणीसाठी राजू शेट्टी आपला प्रस्ताव घेऊन मातोश्रीवर आले होते. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आलंय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात आपला पवित्रा आणखी संघर्षाचा केलाय. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला मात देण्यासाठी महायुती स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आपलंसं करण्याचा प्रयत्नात होती. लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं राष्ट्रवादीविरोधात तगडे उमेदवार देण्याचा निर्णयही घेतलाय.

बारामती, माढा सांगली, हातकणंगले, कोल्हापूर, बुलढाणा, नांदेड ,उस्मानाबाद आणि सोलापूर या जागांवर स्वाभिमानीचे उमेदवार उभे राहणार आहेत. या बळावर महायुतीने स्वाभिमानीसोबत हातमिळवणी केलीय. आता स्वाभिमानी आणि महायुती लोकसभा, विधानसभा निवडणूक एकत्रित लढवणार आहे. यासाठी समन्वय समिती स्थापन करणार आहे. तसंच स्वामीनाथन आणि रंगनाथन समितीच्या शिफारसी स्वीकारण्याची स्वाभिमानीची अट मान्य करण्यात आली असून त्याबरोबरच राज्यात दुष्काळ धोरण राबवणारही अटसुद्धा मान्य करण्यात आलीय या अटी मान्य झाल्यानंतर 'स्वाभिमानी'ने महायुतीशी हातमिळवणी केली.

आज महायुतीच्या नेते आणि स्वाभिमानीच्या नेत्यांमध्ये मातोश्रीवर जागावाटपावर यशस्वी चर्चा पार पडली. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजप नेते गोपीनाथ मुंडे ,विनोद तावडे आणि आरपीआयचे नेते रामदास आठवलेही हजर होते. याच बैठकीत रिपाइंच्या जागावाटपावर चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे 'स्वाभिमानी' अगोदर मनसेच्या वाटेवर होती. त्यानंतर आम आदमी सोबत बैठकही पार पडली. या बैठकीत 'आप'च्या नेत्या अंजली दमानिया यांनी स्वाभिमानी भाजपसोबत चर्चा करत आहे असा संशय व्यक्त केला होता. दमानिया यांनी संशय व्यक्त केल्यामुळे राजू शेट्टी यांनी आप सोबत जाण्याचा निर्णय तडकाफडकी रद्द केला. आता मात्र 'स्वाभिमानी'ने महायुतीशी हातमिळवणी केलीय.

 

महायुतीची ताकद वाढणार

  • - बारामती, माढा, कोल्हापूर आणि हातकणंगले या चार जागांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी
  • - पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, जालना, बुलडाणा या जिल्ह्यांत स्वाभिमानी
  • शेतकरी संघटनेची ताकद
  • - विदर्भ, मराठवाडा, खान्देश या भागांतही स्वाभिमानीच्या मतांचा फायदा महायुतीला होऊ शकतो
  • - पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला आव्हान देण्यासाठी शिवसेना आणि भाजपला मोठी संधी

'स्वाभिमानी' फॅक्टर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आज महायुतीशी हातमिळवणी केली. त्यानंतर राज्यातल्या लोकसभेच्या साधारण पंधरा जागांवर त्याचे परिणाम दिसून येऊ शकतात. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कोट्यातल्या जागांचा विचार केला, तर ज्या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रभाव आहे, तिथे काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठी कसरत करावी लागणार आहे. ते कोणते पंधरा मतदारसंघ आहेत ?

- स्वाभिमानीमुळे महायुतीची ताकद 15 जागांमध्ये वाढणार

- 15 पैकी 6 जागा महायुतीकडे

- काँग्रेसच्या वाट्याच्या जागा - सोलापूर, सांगली, लातूर, शिर्डी

- शिर्डीची जागा शिवसेनेकडे

- राष्ट्रवादीच्या वाट्याच्या जागा - हातकणंगले, कोल्हापूर, सातारा, माढा, उस्मानाबाद, बीड, अहमदनगर (द.), शिरुर, बारामती, मावळ

- हातकणंगलेची जागा राजू शेट्टींकडे

- कोल्हापूरची जागा - अपक्ष सदाशिवराव मंडलिक

- बीडची जागा - भाजपकडे

- अहमदनगर द.- भाजपकडे

- शिरुर - शिवसेनेकडे

- मावळ - शिवसेनेकडे

First published: January 7, 2014, 3:56 PM IST

ताज्या बातम्या