शरद पवारांचा माढा विजयसिंह मोहिते लढवणार?

शरद पवारांचा माढा विजयसिंह मोहिते लढवणार?

  • Share this:

vijaysingh mohite patil06 जानेवारी : लोकसभा निवडणुकीचे पडघम एप्रिलमध्ये वाजणार हे जवळपास निश्चित झालंय. अगोदरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नाही असं स्पष्ट केलंय. त्यामुळे पवारांचा लोकसभा मतदारसंघ माढा कोण लढवणार यासाठी राष्ट्रवादीत आतापासूनच रस्सीखेच सुरू झालीय.

सोलापूर जिल्ह्याच्या माढातून निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादीत अनेक इच्छुक तयार झाले आहे. त्यात रामराजे नाईक निंबाळकर, विजयसिंह मोहिते पाटील, संजय मामा शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाचीही चर्चा असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मात्र माढाच्या उमेदवारीसाठी विजयसिंह मोहिते पाटील यांचं नाव आघाडीवर अशी माहितीही सूत्रांनी दिली.

एकेकाळी विजयसिंह मोहिते पाटील यांचं संपूर्ण सोलापुरात वर्चस्व होतं. मोहिते-पाटील जे म्हणतील तेच व्हायचंय. 1999 -2004 च्या काळात मोहितेंनी उपमुख्यमंत्रीपद आणि मंत्रीपदही भुषवलं. स्व. शंकरराव मोहिते -पाटील यांचे एकेकाळी मोठे वर्चस्व होते. अकलुजकर या नावाने त्यांचे घराणे ओळखले जात होते. आज वर्चस्व जरी नसले तरी सोलापुरात राष्ट्रवादीच दबदबा कायम आहे. त्यामुळेच जिल्हा परिषद राष्ट्रवादीकडे आहे.

दरम्यान, माढा मतदारसंघातून पवार घराण्याचीच व्यक्ती उमेदवार असावी, असाही मतप्रवाह पक्षात आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाचीही चर्चा असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.  तर दुसरीकडे पवारांनी लोकसभेसाठी आपली टीमही जाहीर केलीय. यामध्ये पवारांच्या कन्या बारामतीतून सुप्रिया सुळे, मुंबई संजय दिना पाटील, कल्याण आनंद परांजपे, नवी मुंबई संजीव नाईक, नाशिक समीर भुजबळ, बीड धनंजय मुंडे कोल्हापूर धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक आणि मावळमधून लक्ष्मण जगताप अशीही टीम असणार आहे. एकंदरीतच लोकसभेसाठी राष्ट्रवादीने मोर्चेबांधणीला जोरदार सुरूवात केली असून लवकरच उमेदवारांची नावं जाहीर होणार असल्याची शक्यता आहे.

First published: January 6, 2014, 6:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading