'आदर्श' अहवाल पुन्हा जात्यात?

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 28, 2013 07:09 PM IST

Image img_236542_aadarshscam34_240x180.jpg28 डिसेंबर : आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणावरून काँग्रेस अंतर्गत राजकारण चांगलंच तापू लागलंय. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी 'आदर्श'च्या अहवालावर फेरविचार करा असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सुनावलं. याची अंमलबजावणी लवकरच करण्यात येईल असं मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष जनार्दन चांदूरकारांनी स्पष्ट केलंय.

काँग्रेसच्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमात जर्नादन चांदुरकर यांनी राहुल गांधी यांच्या आभाराचा ठराव मांडत असताना आदर्शच्या अहवालावर फेरविचार केला जाईल असे वक्तव्य केलंय. यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण चांगलेच अडचणीत आलेत. आणि या आजच्या घडामोडींवर ते अजून काहीही बोललेले नाहीत. याच कार्यक्रमादरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मात्र मुख्यमंत्र्यांची पाठराखण केलीय. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही, असं वक्तव्य त्यांनी केलंय. पालकमंत्री नसीम खान यांनी आदर्शच्या अहवालावर फेरविचार केला जाईल याला दुजोरा दिलाय.

आदर्श सोसायटी घोटाळ्याच्या न्यायालयीन चौकशीचा अहवाल राज्य सरकारनं फेटाळलाय. यावरून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी नाराजी व्यक्त केली. राहुल गांधींचे निकटवर्तीय आणि केंद्रीय जहाजबांधणी राज्यमंत्री मिलिंद देवरांनी यावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. आदर्श आयोगाच्या अहवालात काही प्रश्नं उपस्थित करण्यात आले असतील तर त्यांची उत्तरं दिली पाहिजेत, असं ट्विट त्यांनी केलंय. यापूर्वी दोषी लोकप्रतिनिधींसंबंधी सरकारनं काढलेल्या वटहुकुमाविरोधात मिलिंद देवरा यांनी ट्विट केलं होतं. त्यानंतर राहुल गांधी यांनी त्याविरोधात जाहीर भूमिका घेतली होती. आदर्शच्या बाबतीतल्या या सर्व घडामोडी पाहिल्या तर विरोधक आधीच आक्रमक झालेत. सहकारी पक्ष राष्ट्रवादीही या बाबतीत मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्याची संधी सोडत नाही. निवडणुका तोंडावर आल्यात. अलिकडेच्या काही निवडणुकांमध्येही काँग्रेसचा दारूण पराभव झालेला आहे. त्या पार्श्वभूमीवर आदर्शच्या अहवालाचा फेरविचार काँग्रेसला करावा लागणार अशी शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 28, 2013 06:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...