आदर्श अहवालावरून राहुल गांधींची मुख्यमंत्र्यांना चपराक

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Dec 27, 2013 09:08 PM IST

rahul team27 डिसेंबर : आदर्श घोटाळ्याची चौकशी करणार्‍या आयोगाचा अहवाल फेटाळण्याचा निर्णय घेणार्‍या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राज्य सरकारला काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सणसणीत चपराक मारली आहे. आदर्शचा अहवाल फेटाळण्याच्या निर्णयाशी आपण सहमत नसल्याचे राहुल यांनी स्पष्ट केले आहे.

दिल्लीमध्ये आज काँग्रेस शासित मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी आदर्श अहवाल फेटाळण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा असे मत व्यक्त केले. विशेष म्हणजे राहुल आदर्शविषयी बोलत असताना, राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे त्यांच्यासोबत बसले होते. आदर्शचा अहवाल फेटाळण्याच्या निर्णयानंतर राज्यातल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारवर चहुबाजूंनी टीका होत होती.

एकीकडे राहुल गांधी भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी कटिबद्ध असल्याचं वेगवेगळ्या व्यासपीठांवरून सांगत होते, तर दुसरीकडं राज्य सरकार आदर्शचा अहवाल फेटाळून भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र दिसत होते. त्यामुळे एकंदरीतच आदर्शचा मुद्दा हा एकीकडे राज्य सरकारच्या प्रतिमेबरोबरच राहुल गांधी यांच्या भ्रष्टाचाराच्या लढाईशीही जोडला गेला होता. त्यातच बुधवारी मिलिंद देवरा यांनी राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात ट्विट केलं होतं, तेव्हाच राहुल गांधी या निर्णयावरून नाराज असल्याचे उघड झाले होते. आयबीएन लोकमतने तशी बातमीही दाखवली होती.

Loading...

राहुल गांधी यांच्या सुचनेनुसार मंत्रिमंडळाशी चर्चा करून आदर्शप्रकरणी पुन्हा निर्णय घेऊ असं राज्याचे मुख्यामंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. देशात काँग्रेसचे सरकार असलेल्या राज्यांचे सगळे मुख्यमंत्री आज या बैठकीला हजर होते. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकपाल, महागाई आणि अन्न सुरक्षा यावर काय भूमिका घ्यायची आणि कोणते मुद्दे लोकांमध्ये मांडायचे यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली होती. लोकसभा निवडणुकींना वेळ कमी असल्यामुळे बोलण्या पेक्षा, आता कृतीची गरज असल्याच ही राहुल गांधी यांनी या वेळेस सांगितल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 27, 2013 08:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...