जादूटोणाविरोधी विधेयक विधानसभेत मंजूर

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 13, 2013 11:22 PM IST

जादूटोणाविरोधी विधेयक विधानसभेत मंजूर

jadutona13 डिसेंबर : 18 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर जादूटोणा विरोधी विधेयक मंजूर करण्याचा ऐतिहासिक निर्णय विधानसभेत घेण्यात आलाय. आज विधासभेत जादूटोणा विरोधी विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. भाजप आणि शिवसेनेच्या विरोध डावलून विधेयकाला आवाजी मतदानानं मंजुरी मिळालीय. आता हे विधेयक सोमवारी विधान परिषदेत मांडलं जाणार आहे.

डॉ.नरेंद्र दाभोलकर यांनी तब्बल 18 वर्ष ज्या जादूटोणाविरोधी विधेयकासाठी लढा दिला ते विधेयक आता कायदेशीररित्या अस्तित्वात येत आहे. याचा पहिला टप्पा अगोदर राज्य सरकारने वटहुकूम काढून पूर्ण केला. मात्र जादूटोणाविरोधी विधेयकावर कायदेशीर शिक्कामोर्तब करण्यासाठी हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडले जाईल असं राज्य सरकारने स्पष्ट केलं होतं.

अखेर ठरल्याप्रमाणे हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडण्यात आलं. पण या विधेयकावर अपेक्षेप्रमाणे सेना-भाजपनं आपला खरा रंग दाखवला. एखाद्या दुसर्‍या मुद्यावर आक्षेप घेत, विरोधक विधेयकाच्या संमतीसाठी सरकारची कोंडी केली. शिवसेनेनं विरोधकाला कडाडून विरोध केलाय. एवढंच नाही, तर या विधेयकासाठी झटणार्‍या डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि शाम मानव यांच्यावरसुद्धा शिवसेनेनं चिखलफेक केली. सेनेचे आमदार दिवाकर रावते यांनी दाभोलकर हे सरकारचे दलाल होते अशी वादग्रस्त टीका केली होती. दुसरीकडे विधेयक आपल्या मनाप्रमाणे झालं नाही, तर आपणही वेगळी भूमिका घेऊ शकतो असं म्हणत भाजपनेही छुपा विरोध सुरु केला होता.

. सरकारनं तयारी पूर्ण केली असताना पण विरोधक मात्र कधी कट्टरवाद्यांच्या, तर वारकर्‍यांच्या माध्यमातून शेवटपर्यंत सरकारवर दबाव आणत होते. एवढंच नाही, तर विधिमंडळाच्या चर्चेतही सत्ताधारी आमदारांनासुद्धा विधेयकाच्या विरोधात बोलायला लावण्याची तयारी विरोधकांनी केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळत विधेयकाचा मार्ग सुकर केला. जादूटोणाविरोधी विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आलं. आता हे विधेयक सोमवारी विधान परिषदेत मांडलं जाणार आहे. विधान परिषदेत मंजुरीनंतर खर्‍या अर्थाने जादूटोणाविरोधी कायदा संपूर्ण राज्यात अस्तित्वात येईल. हे विधेयक मंजूर झालं तर हीच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

Loading...

या विधेयकावर विविध नेत्यांची प्रतिक्रिया

देवेंद्र फडणवीस - विधेयकात आयपीसीच्या कलमाचांच भरणा आहे, या विधेयकात नवीन काहीच नाही. हे विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडं पाठवण्यात यावं

सुभाष देसाई - गटनेते, शिवसेना - हे विधेयक हिंदूविरोधी आहे. या विधेयकाचा ऍट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे दुरूपयोग होईल. त्यामुळे शिवेसनेचा या विधेयकाला विरोध आहे.

छगन भुजबळ - या विधेयकावर सभागृहात सांगोपांग चर्चा झालीय. सर्वांचं म्हणणं सभागृहानं ऐकलय. बहुतेक दुरूस्त्या सरकारनं मान्य केल्या आहेत.आता हे विधेयक मंजूर करून देशासमोर आपण आदर्श ठेवला पाहिजे.

हर्षवर्धन पाटील - संसदीय कार्य मंत्री - अध्यादेश काढल्यामुळं आधी विधानसभेत आणि पुढच्या आठवड्यात विधानपरिषदेत हे विधेयक मंजूर होईल. त्यासाठी विरोधकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. कमी जास्त काही असेल तर त्यात सुधारणा करण्यात येईल.

जादूटोणा प्रतिबंधक विधेयकातल्या सुधारणा

 1. कोणत्याही धार्मिक किंवा आध्यात्मिक स्थळांच्या ठिकाणी घातलेल्या प्रदक्षिणा, यात्रा, परिक्रमा या प्रकारचे उपासनामार्ग तसेच वारकरी संप्रदायाच्या आणि इतर वार्‍या,

2. हरिपाठ, कीर्तन, प्रवचनं, भजनं, धार्मिक आणि पारंपरिक शास्त्रांचे तसंच प्राचीन विद्या आणि कलांचे शिक्षण, आचरण, प्रचार आणि प्रसार,

3. दिवंगत संतांचे चमत्कार सांगणे, त्यांचा प्रसार, प्रचार आणि साहित्य वितरण करणं, तसेच शारीरिक आणि आर्थिक नुकसान न करणार्‍या प्रकारचे धर्मगुरूंचे चमत्कार सांगणं त्यांचा प्रसार, प्रचार आणि साहित्य वितरण करणं,

4. घर, मंदिर, दर्गा, गुरुद्वारा, पॅगोडा, चर्च किंवा इतर प्रार्थनास्थळं, अशा ठिकाणी व्यक्तींकडून किंवा व्यवस्थापनांद्वारे शारीरिक आणि आर्थिक नुकसान न करणारे अशा प्रकारचे केले जाणारे, प्रार्थना, उपासना आणि सर्व धार्मिक विधी,

5. सर्व धार्मिक उत्सव, सण, प्रार्थना, मिरवणूक आणि त्यासंबंधातली कृत्यं, अंगात येणं, कडक लक्ष्मी, व्रतवैकल्यं, उपवास, नवस बोलणं, मन्नत मागणं, मोहरम मिरवणूक इत्यादी सर्व धार्मिक विधी,

6. धार्मिक विधीनुसार लहान मुलांचे कान आणि नाक टोचणं, जैन धर्मीयांद्वारा करण्यात येणारे केशलोचन यासारखे धार्मिक विधी,

7. वास्तुशास्त्रानुसार तसंच जोशी-ज्योतिषी, नंदीबैलवाले ज्योतिषी आणि इतर ज्योतिषींद्वारे दिला जाणारा सल्ला, जमिनीखालचे पाणी सांगण्याबद्दल सल्ला देणं,

8. राज्य शासन राजपत्रातल्या अधिसूचनेद्वारे घोषित करेल अशी वर नमूद केल्याव्यतिरिक्त कोणतीही परंपरागत धार्मिक विधी आणि कृत्यं.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 13, 2013 11:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...