10 डिसेंबर : लोकपाल विधेयकासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं बेमुदत उपोषण सुरू झालंय. राज्यसरकारने अण्णांच्या आंदोलनचा तातडीने दखल घेत हालचाल सुरु केली. संध्याकाळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अण्णांची राळेगणसिद्धीत जाऊन भेट घेतली आणि उपोषण मागे घ्यावं अशी विनंती केली.मात्र अण्णांनी थोरात यांच्या मागणीला नकार दिला. या अगोदरही माझी अशी फसवणूक झालीय, त्यामुळे मला पुन्हा उचलण्याचा प्रयत्न केला तर पाणीसुद्धा पिणार नाही असा इशारा अण्णांनी दिला. लोकपाल जोपर्यंत मांडले जात नाही तोपर्यंत आंदोलन उपोषण सोडणार नाही असा निर्धार अण्णांनी केला.
अण्णांनी पुन्हा एकदा लोकपाल विधेयकासाठी उपोषणास्त्र उपसले आहे. आज सकाळी अण्णा आपल्या गावी राळेगणसिद्धीमध्ये उपोषणाला बसले आहे. आता सरकारशी चर्चा नाही. आंदोलनाच्या सुरूवातीलच लोकपालसाठी आता 'आर या पार' ची लढाई असेल असं अण्णांनी स्पष्ट केलं. केंद्र सरकार जोपर्यंत जनलोकपाल विधेयक मंजूर करत नाही तोपर्यंत आपलं उपोषण सुरू राहणार अशी घोषणा अण्णांनी केलीय. तसंच राजकारण्यांना आपल्या उपोषणाला हजेरी लावायची असली तर त्यांनी यावं पण त्यांना स्टेजवर येऊ दिलं जाणार नाही असंही अण्णांना सांगितलं. दरम्यान, लोकपाल विधेयक याच अधिवेशनात मंजूर करू असं पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री नारायण सामी यांनी स्पष्ट केलं. सामी यांच्या घोषणेनंतर जर असं असेल तर मी त्यांचं अभिनंदन करतो असं अण्णा म्हणाले.