18 नोव्हेंबर : सातारा गर्भलिंग चाचणी प्रकरणी डॉ.विलास सावंत आणि त्याचा एजंट अजय सावंत अजूनही फरार आहेत. पोलीस पथकं त्यांचा कसून शोध घेत आहे. सातार्यातल्या म्हसवड तालुक्यात डॉ. सावंत मारूती ओम्नी गाडीत सोनोग्राफी मशीन बसवून गर्भवती महिलांची सोनोग्राफी करायचे.
पुण्यातल्या सामाजिक कार्यकर्त्या यामिनी अडबे यांनी हा प्रकार उघडकीला आणलाय. सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यात राहणार्या महिला पिंपरी गावातल्या चैतन्य क्लिनीकमध्ये गर्भलिंग चाचणी करण्यासाठी येत असत. त्यांना ओम्नी गाडीत बसवलं जायचं. याच फिरत्या गाडीत डॉक्टर सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी करायचे.
तपासणी संपली की महिलांना गाडीतून उतरल्यानंतर बर्फी वाटा किंवा पेढा वाटा असं सांगितल जायचं. इतकंच नाही तर ही गाडी गावोगावी फिरवून गर्भलिंग निदान केलं जायचं. ही गाडी आता जप्त करण्यात आलीय. या प्रकरणी डॉक्टर दिलीप राजगे आणि डॉक्टर विलास सावंत यांच्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आलीय. तर कंपाऊंडर दिलीप राजगेला रविवारी अटक करण्यात आलीय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा