13 नोव्हेंबर : महापालिकेच्या कारवाईचा हातोडा पडणार असल्याने रस्त्यावर येण्याची भिती असलेल्या कॅम्पा कोलातील रहिवाशांना सुप्रीम कोर्टाने बुधवारी दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने कॅम्पा कोलातील बेकायदेशीर मजले पाडण्यास ३१ मेपर्यंत स्थगिती दिल्याने महापालिकेला कारवाई थांबवावी लागली. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे कॅम्पा कोलातील रहिवाशांनी स्वागत करत आनंदोत्सवच साजरा केला.
वरळी कॅम्पा कोला इमारतीतील ३५ बेकायदेशीर पाडण्यासाठी महापालिकेचे पथक गेल्या दोन दिवसांपासून कॅम्पा कोलात दाखल झाले होते. मंगळवारी रहिवाशांच्या तीव्र विरोधामुळे महापालिकेला काही घरांचे वीज,पाणी आणि गॅस कनेक्शन तोडण्यावरच समाधान मानावे लागले. आज सकाळी महापालिकेचे पथक कारवाईसाठी कॅम्पा कोलात दाखल झाले होते.पोलिसांनी गेटवर ठाण मांडून बसलेल्या रहिवाशांना पोलिसी खाक्या दाखवत बाजूला केले आणि त्यानंतर महापालिकेच्या पथकाने इमारतीच्या गेटवरच बुलडोझर फिरवला होता.
त्यामुळे कॅम्पा कोलातील रहिवाशांची चेह-यावर संताप अन् डोळ्यात अश्रू अशी अवस्था झाली होती. मात्र दुपारी साडे अकराच्या सुमारास सुप्रीम कोर्टाने कॅम्पा कोलावरील कारवाई ३१ मे २०१४ पर्यंत थांबवण्याचे आदेश देत रहिवाशांना आणखी सहा महिन्यांचा दिलासा दिला. या कालावधीत कॅम्पा कोलातील बेकायदेशीर मजल्यांना अधिकृत करण्यासाठी लढा देऊ असा निर्धार रहिवाशांनी केला आहे.