भूतबाधा झाली म्हणून तरूणाचा बळी देण्याचा प्रयत्न

भूतबाधा झाली म्हणून तरूणाचा बळी देण्याचा प्रयत्न

  • Share this:

vasai news12 नोव्हेंबर : वडिलांचं भूत अंगात उतरलं म्हणून एका तरुणाला जिवंत पेटवून,अतोनात छळ केल्याची धक्कादायक घटना वसईमध्ये घडलीय. मृत वडिलांचं भूत उतरवण्यासाठी 21 वर्षांच्या मुलाचा अघोरी पद्धतीने बळी देण्याचा प्रयत्न वसईतल्या निर्मळ गावी करण्यात आला. जितेश सुरेश घोसे असं या तरुणाचं नाव आहे. तब्बल दोन महिन्यानंतर हा सर्व अघोरी प्रकार समोर आलाय.

घडलेली हकीकत अशी की, वसईतील निर्मळ गावात जितेश सुरेश घोसे हा तरूण राहतो. दोन महिन्यांपूर्वी जितेशचे वडील सुरेश घोसे यांचा अचानक मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूचा जितेशच्या मनावर खोल परिणाम झाला. तो एकटा राहू लागला. अचानक स्वत:शीच बडबड करु लागला. हा सर्व प्रकार घरच्यांना विचित्र वाटू लागल्याने जितेशला काही तरी भूतबाधा झाल्याची चर्चा होऊ लागली. जितेशच्या घराच्या बाजूला राहणार्‍या दर्शना जाधव या महिलेने जितेशच्या अंगात त्याच्या वडिलांचे भूत आहे. आणि ते काढले पाहिजे असे जितेशच्या घरच्यांना पटवून दिलं.

दर्शना पूजा-अर्चा आणि देवाचे सर्व करतेय हे गावातील इतरही लोकांना माहित होते. त्यामुळे सर्व गावकरी पण तिच्या बोलण्यात आले व जितेशला भुताने पछाडलंय. अशी सर्वांची धारणा झाली. 9सप्टेंबर 2013 रोजी दर्शनाने जितेशच्या अंगातले भूत काढण्याचे ठरवले. रात्री 10 वाजता दर्शनाने हळद,कुंकू, लिंबू आणि इतर भूत काढण्याचं सामान घेऊन जितेशच्या घरी पोहोचली. तिने सर्व घरच्यांना विश्वासात घेऊन जितेशचे भूत काढण्यास सुरुवात केली. सुरवातीला दर्शनाने हळद-कुंकू लाऊन त्याची पुजा केली. नंतर तिने त्याच्या अंगावर जळता कापूर टाकला. जितेश मोठमोठ्याने ओरडत होता. जितेशच्या विव्हळण्याने त्याच्या अंगातल भूत निघून जात असल्याचं दर्शना सगळ्यांना सांगू लागली. त्यानंतर दर्शनाने जितेशच्या अंगावर रॉकेल टाकले आणि त्याला पेटवून दिले.

इतकच नाही तर जळता तप्त कोयता त्याच्या तोंडात घातला. त्याने जितेशचे पूर्ण तोंड आणि ओठ जळाले. दर्शनाचा कहर इतक्यावरच थांबला नाही तर तिने केबलने त्याचा गळा दाबला. तसेच त्याच्या गळ्यात सुया टोचल्या. हा सर्व प्रकार गावकरी आणि जितेशच्या घरच्यांच्या समोर होत होता.

इतका अघोरी प्रकार होवुनही जितेश वाचला पण त्याच्या शरीरावरील या जखमा त्याच्या यातनांची कहाणी कथन करत आहेत.आज जितेश नीट बोलु शकत नाही. काही खाऊ शकत नाही आणि विशेष म्हणजे इतके होऊनही त्याच्या घरचे त्याची साख देत नाहीत. मोठी हिम्मत करुन आज जितेशने वसई पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवलीय. पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर दर्शनाने पळ काढलाय. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 12, 2013 01:54 PM IST

ताज्या बातम्या