बाळासाहेबांचा स्मृती चौथ-याचे काम अंतिम टप्प्यात

बाळासाहेबांचा स्मृती चौथ-याचे काम अंतिम टप्प्यात

  • Share this:

balasaheb smarkविनोद तळेकर, मुंबइ

6 नोव्हेंबर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पहिल्या स्मृतीदिना निमित्त शिवाजी पार्कवर स्मृती चौथ-याचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. या चौथ-याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आज महापौर व पोलिस आयुक्त यांची महापौरांच्या निवासस्थानी एक बैठक होणार असून या बैठकीत मैदानाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावाही घेतला जाणार आहे.

गेल्या वर्षी १७ नोव्हेंबर रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जगाचा निरोप घेतला. बाळासाहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे स्मारक बांधण्यात यावे अशी मागणी शिवसैनिक करत आहेत. मात्र प्रत्यक्षात ही मागणी पूर्ण करण्यास शिवसेनेला यश आलेले नाही. शिवाजी पार्क, महालक्ष्मी रेसकोर्स, दादर पार्क क्लब यापैकी एका ठिकाणी बाळासाहेबांचे स्मारक व्हावे यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरु आहेत. यासंदर्भात राज्य सरकारशी चर्चा करण्यासाठी शिवसेनेने एका समन्वय समितीचीही स्थापना केली आहे. महापालिकेत सत्ता असूनही बाळासाहेबांच्या निधनाच्या वर्षभरानंतरही स्मारक होत नसल्याने सेना कार्यकर्त्यामध्ये संताप व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्ता शिवाजी पार्कवर स्मृती चौथ-याचे काम व्यवस्थित व्हावे यासाठी नियोजीत वेळेत पूर्ण व्हावे यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहे. स्मृती चौथ-यासाठी सेनेने महापालिकेकडे तीन नकाशे पाठवले होते. यातील एकाला महापालिकेने मंजुरी दिल्यावर चौथ-याचे काम सुरु झाले आहे. या चौथ-यासाठी खास राजस्थानहून लाद्या मागवल्या असून चौथ-याच्या विद्यूत रोषणाईचे कंत्राट क्रॉम्प्टन ग्रीव्हज या कंपनीला देण्यात आले आहे. १२ नोव्हेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आदेश सेना नेत्यांनी दिले आहेत. मात्र स्मृती चौथ-याचे काम पूर्ण करण्यासाठीही एक वर्षाचा कालावधी लागल्याने सेना नेत्यांची नाचक्की झाली आहे हे मात्र नक्की.

First published: November 6, 2013, 4:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading