31 ऑक्टोबर: मराठवाड्यासाठी सोडलेल्या पाण्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातून विरोध वाढत चाललाय. आज लोणीच्या गावकर्यांनी गावबंद करून नाशिक-नगर हायवे अडवला होता. सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून शेतकर्यांनी निर्णयाचा निषेध केलाय. मराठवाड्याला पाणी सोडताना सरकारनं अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातल्या शेतकर्यांचाही विचार करणं गरजेचं असल्याचं आंदोलनकर्त्यांनी म्हटलंय. आपल्याला शेतीसाठी पाणी मिळेल या आशेवर हजारो एकरावर ऊस आणि अन्य पिकं शेतकर्यांनी घेतलेली आहेत. हे पाणी जर मराठवाड्याला दिलं गेलं तर नगरच्या शेतकर्यांचा सिंचनाचा प्रश्न गंभीर होणार आहे. त्यामुळे हा निर्णय लगेच रद्द करावा या मागणीसाठी विविध भागात आंदोलनं केली जाताहेत.जलसंपदामंत्र्यांच्या आदेशानंतर नगर जिल्ह्यातल्या निळवंडे धरणातून मराठवाड्यासाठी पाणी सोडण्यात आलं. पण शेतकर्यांनी नदीतून मराठवाड्याकडं निघालेलं पाणी कालव्यात सोडून पाणी जाणं बंद केलय.