09 ऑक्टोबर : मी सहा साखर कारखाने विकत घेतले हा आरोप धादांत खोटा आहे. लोकांची दिशाभूल केली जातेय. माझ्या नातेवाईकांनी फक्त दोन साखर कारखाने लिलावात विकत घेतले. माझं नाव ज्या कंपनीशी जोडलं जातंय, त्याच्याशी माझा संबंध नाही असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं.
मंगळवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि मेधा पाटकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सहकारी साखर कारखान्याचा घोटाळा उघडकीस आणला. गेल्या आठ वर्षात 40 सहकारी साखर कारखाने बेकादेशीरित्या विकल्याचा आरोप मेधा पाटकर आणि अण्णा हजारेंनी केलाय. या घोटाळ्यात सहकारी साखर कारखान्यांची कोट्यावधी रुपयांची मालमत्ता विकली गेली. तसंच शेतकरी, सभासद आणि कामगारांचे सुमारे 800 कोटी रुपयेसुद्धा बुडवले गेलेत.
या संपूर्ण घोटाळ्यात सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग असल्याचा आरोप आरोप माजी आमदार माणिकराव जाधव यांनी केलाय. या संपूर्ण घोटाळ्यात अजित पवार यांच्या संबंधित सहा कंपन्यांनी कारखाने विकले असा आरोप करण्यात आला होता. त्यांच्यासह छगन भुजबळ, जयंत पाटील, अशोक चव्हाण, अमित देशमुख, नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, फौजिया खान अशा अनेक नेत्यांनी सहकारी साखर कारखाने लाटले असा आरोपही माणिकराव जाधव यांनी केलाय.