18 सप्टेंबर : मुंबईत छायाचित्रकार तरूणीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी चारही आरोपींविरोधात उद्या आरोपपत्र दाखल केलं जाणार आहे. या चारही नराधमांविरोधात बलात्कार, गुन्हेगारी कटाचा आरोप लावला जाण्याची शक्यता आहे. दोनच दिवसांपूर्वी गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी 19 सप्टेंबर रोजी आरोपपत्र दाखल करणार असं स्पष्ट केलं होतं.
मागिल महिन्यात 22 ऑगस्ट रोजी महालक्ष्मी येथील शक्ती मिलमध्ये एक छायाचित्रकार तरूणी आपल्या सहकार्यासह फोटोशूट करण्यासाठी गेली होती. यावेळी पाच नराधमांनी या दोघांना अडवले. आणि तिच्या सहकार्याला मारहाण करून पीडित तरूणीवर दोघांनी अत्याचार केला होता.
या प्रकरणी पोलिसांनी तीनच दिवसात पाचही आरोपींनी अटक केली. यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याचं स्पष्ट झालं. त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. तर इतर आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आलीय. आरोपींविरोधात पोलिसांनी डीएनए चाचणी घेतलीय. तसंच घटनास्थळी आरोपींना नेऊन जबाबही नोंदवण्यात आलाय.