नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर: सध्या पंजाबमध्ये राजकीय उलथापालथीला वेग आला आहे. कॉंग्रेसनं आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अचानक मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Captain Amarinder Singh) यांना हटवून राज्याची सूत्रे चरणजितसिंग चन्नी (Punjab Politics Update) यांच्याकडे सोपवली. यामुळे नाराज असलेल्या माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी भाजपशी जवळीक साधली. आता त्यांनी नवीन पक्ष स्थापनेची घोषणा केल्यामुळे आगामी निवडणूकीची सगळी गणिते बदलण्याची चिन्हे दिसू लागल्यानं काँग्रेससहित आम आदमी पक्षालाही धक्का बसला आहे.
पंजाबमधील राजकारणात नवनवीन नाट्यमय घडामोडी घडू लागल्या असून, एका नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे. ते म्हणजे पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांची पाकिस्तानी मैत्रीण पत्रकार अरूसा आलम (Aroosa Alam and Captain Amarinder Singh) यांचे पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा 'आयएसआय'शी (ISI) संबंध असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखजिंदरसिंग रंधावा यांनीही 'कॅप्टन अमरिंदर सिंह यांची पाकिस्तानी मैत्रीण अरूसा आलम यांचे 'आयएसआय'शी संबंध असल्याचा दावा करत त्याबाबत चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सध्या पंजाबच्या राजकारणात पाकिस्तानी पत्रकार अरूसा आलम चर्चेत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर आलम यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आजतकला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
हे वाचा-'ते काम होत नसेल तर बदली करून घ्या'; शाहांनी काश्मीरमधील अधिकाऱ्यांना खडसावलं
अरूसा आलम यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले असून माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे आपले चांगले मित्र असल्याचं म्हटलं आहे. अरूसा आलम यांनी सांगितलं की, आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी 56 वर्षांची आणि ते 66 वर्षांचे होते. या वयात कोणी प्रेमिकाचा शोध घेत नाही. प्रेम, रोमान्स याचे या वयात महत्त्व नसते. आम्ही दोघे चांगले मित्र आहोत, सोलमेट आहोत. आमची कौटुंबिक मैत्रीही आहे. मी त्यांची आई, बहीण आणि कुटुंबालाही भेटले आहे.
आम आदमी पक्षाचे नेते हरपालसिंग चीमा, खासदार नवज्योतसिंग सिद्धु आणि त्यांची पत्नी नवज्योत कौर सिद्धु यांनीही अरूसा आलम यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. तर उपमुख्यमंत्री सुखजिंदरसिंग रंधावा यांनी अरूसा यांचे आयएसआयशी संबंध असल्याबाबत चौकशी होणार असल्याचं सांगितलं आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्याशी आपले यावरून अमेरिकेत वाद झाल्याचंही रंधावा यांनी म्हटलं आहे. त्याबाबत बोलताना अरूसा म्हणाल्या की, मी गेली 16 वर्षे भारतात येत आहे, प्रत्येक वेळी मला सुरक्षा यंत्रणेकडून क्लिअरन्स मिळाला आहे. पाकिस्तानी व्हिसा मिळतो तेव्हा सर्व चौकशी केली जाते. अनेक एजन्सी यात सहभागी असतात. इतक्या वर्षांत चौकशी करणाऱ्या एजन्सींना माझ्या आयएसआयशी संबंध असण्याबद्दल कधीच काही का नाही आढळलं? माझा आयएसआयशी संबंध असेल तर इतक्या वर्षात त्याबद्दल काहीही शोधून न काढता आलेल्या तुमच्या सुरक्षा एजन्सीजचं हे अपयश आहे, असं म्हणावं लागेल.
हे वाचा-फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग, पाच जणांचा होरपळून मृत्यू
दरम्यान, अरूसा यांच्यावर करण्यात आलेल्या या आरोपानंतर कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या वतीनं त्यांचे माध्यम सल्लागार रवीन ठुकाराल यांनी ट्वीट करून, अरूसा आलम भारत सरकारच्या परवानगीनचं गेली 16 वर्षे भारतात येत असल्याचं म्हटलं आहे.
आपल्यावर विरोधकांकडून होणारे आरोप म्हणजे संधिसाधू राजकारण्यांची खेळी असल्याची टीका अरूसा आलम यांनी केली आहे. सत्तेच्या लालसेपोटी हे सर्व घाणेरडे राजकारण चालले आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. पंजाब पोलीस दलात होणाऱ्या नियुक्त्याही अरूसा यांच्या संमतीने होत होत्या, तसेच अरूसा यांनी मोठ्या प्रमाणात पाकिस्तानात पैसा नेला असल्याचा आरोप नवज्योत कौर सिद्धू यांनी केला आहे. त्याला उत्तर देताना अरूसा म्हणाल्या की, कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्याबरोबर गेली 13 वर्षे माझी मैत्री आहे. ते तेव्हा विरोधी पक्षात होते. ते इतकी वर्षे सत्तेतच नव्हते तर मी कशी एसपी, एसएसपी किंवा डीएसपी यांना ओळखत असेन. मी कशा नियुक्त्या आणि बदल्या मॅनेज करू शकेन? कोणत्या मंत्र्याकडे कोणता विभाग होता हे देखील मला माहीत नाही. कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्याशी मी कधी राजकारणावर चर्चा करायला लागले तर चिडत असत. मित्रमंडळी जमवा, मजा करा; पण राजकारणापासून दूर रहा, असं ते नेहमी सांगत.'
'कोणीही कोणावर काहीही आरोप करू शकतात. मीदेखील नवज्योत कौर सिद्धू यांच्यावर आरोप करू शकते. त्या अनेक वर्षे आपले पती नवज्योत सिंह सिद्धू यांच्याबरोबर राहत नव्हत्या. सिद्धू मुंबईत आणि नवज्योत कौर पंजाबमध्ये मंत्रालय सांभाळत होत्या. नवज्योत सिंह सिद्धू हे पैसे घेतल्याशिवाय कोणतंही काम करत नव्हते अशा अनेक तक्रारी मी ऐकल्या आहेत. नवज्योत कौर सिद्धू आरोप करतात की मी पैसे आणि दागिने पाकिस्तानात नेले. मी असं काहीही कधीही केलेलं नाही. मी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून भारतात आले आहे. प्रत्येक वेळी सीमारेषेवर सुरक्षा तपासणी होते. कधीही काहीही मिळाले नाही. गेल्या वर्षीच्या सुरुवातीपासून तर मी इस्लामाबादमध्येच आहे,' असंही अरूसा यांनी स्पष्ट केलं.
या सगळ्या चर्चेचा परिणाम माझ्या कुटुंबावर, मुलांवर पडत असून, त्यांचे अनेक प्रश्न असतात आणि मी काहीही उत्तर देऊ शकत नाही. माझ्या मुलांनी मला नेहमीच पाठिंबा दिला आहे, त्याची मोठी किंमत आता मला चुकवावी लागत आहे, असंही अरूसा यांनी नमूद केलं. अरूसा आलम यांनी खुलासा केला असला तरी हे प्रकरण नेमकं कोणतं वळण घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राजकारणातील या नवनवीन नाट्यमय घडामोडीचा शेवट काय होतो हे बघणं औत्स्युक्याचे ठरेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Punjab