अर्णब गोस्वामी प्रकरण : फडणवीसांवर काय आहे काँग्रेसचा आरोप अन् भाजपने कसं दिलं प्रत्युत्तर? जाणून घ्या

अर्णब गोस्वामी प्रकरण : फडणवीसांवर काय आहे काँग्रेसचा आरोप अन् भाजपने कसं दिलं प्रत्युत्तर? जाणून घ्या

राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले असून भाजप आणि महाविकास आघाडी आमने-सामने आले आहेत.

  • Share this:

मुंबई, 4 नोव्हेंबर : अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात नाईक यांच्या पत्नीने तक्रार दाखल केली होती. 2018 मध्ये झालेल्या या आत्महत्येप्रकरणी आज सकाळीच रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक केली. त्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले असून भाजप आणि महाविकास आघाडी आमने-सामने आले आहेत.

'या कारवाईचं काँग्रेस स्वागत‌ करते. नाईक परिवाराला न्याय‌ मिळाला आहे. त्यांना श्रद्धांजली या कारवाईनं मिळाली असं म्हटले तर वावगं नाही. तत्कालीन मुख्यमंत्री फडवणीस यांनी प्रकरण दाबले होते. वारंवार काँग्रेस पक्षाने नाईक कुटुंबाचा आवाज उठवण्याचं काम केलं. पण दहशतीने हे प्रकरण दाबले गेले,' असा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

शिवसेनेनंही दिली तिखट प्रतिक्रिया

शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी अर्णब गोस्वामी अटकेप्रकरणी भाजपने केलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. 'पोलीस पुराव्यानिशी काम करतात, जो न्याय सर्वसामान्यांना तोच अर्णबला आहे. सर्वांनीच बघितलं अर्णब गोस्वामीनं पोलिसांना कसं सहकार्य केलं, पोलीस त्यांची कारवाई करणारच. आपली वाईट कृत्य लपण्यासाठी घसा फोडून फोडून ओरडणाऱ्यांना आज अटक झाली आहे,' असा टोला किशोरी पेडणेकर यांनी लगावला.

भाजपकडून उद्धव ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न

'अर्णब गोस्वामीवरची कारवाई ही सुडबुद्धीने केली असून गोस्वामी यांनी सुशांत सिंह प्रकरणात न्यायाची बाजू लावून धरली होती आणि मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा संबंध कसा आहे हे पुराव्यानिशी मांडलं होतं. त्याचा राग मनात धरुन जुनी बंद झालेली केस उघडून कारवाई केली, याचा निषेध,' अशी प्रतिक्रिया भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिली आहे.

दुसरीकडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. 'भाजप अन्याय सहन करणार नाही. अन्याय अत्याचाराच्या विरोधात सगळ्यांनी उतरलं पाहिजे. त्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे. मात्र अर्णबची ज्या प्रमाणे अटक केली ते योग्य नाही. अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा आम्ही निषेध करतो,' असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

Published by: Akshay Shitole
First published: November 4, 2020, 5:42 PM IST

ताज्या बातम्या