सिद्धार्थ गोदाम, प्रतिनिधी
औरंगाबाद, 14 मार्च : जालना मतदारसंघात उमेदवारीवरुन शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर अजूनही नाराज आहे. आज औरंगाबादमध्ये खोतकर यांची काँग्रेसचे नेते अब्दुल सत्तार यांच्यासोबत गुप्त बैठक पार पडल्याची माहितीसमोर आली आहे. या बैठकीत खोतकरांनी अब्दुल सत्तार यांच्याकडे 2 दिवसांचा कालावधी मागितला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शहरातील सातारा परिसरात राहणाऱ्या एका प्रसिद्ध बिल्डराच्या घरी संध्याकाळी ही गुप्त बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अब्दुल सत्तारांनी खोतकर यांना 24 तासांचं अल्टिमेटम दिल्याचं कळत आहे. तसंच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंविरोधात लोकसभा लढवणार की नाही, याचा खुलासाही मागितला. यावर खोतकरांनी 2 दिवसांचा कालावधी मागितला असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
विशेष म्हणजे, जालन्यातून रावसाहेब दानवे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. युतीकडून अर्जुन खोतकर यांना जालनासह मराठवाड्यातील मतदारसंघात समन्वयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. समन्वयाची जबाबदारी सोपवल्यामुळे खोतकरांना उमेदवारी नाकारण्यात जमा आहे. परंतु, खोतकरांनी 'आपण अजून मैदानात आहोत, अंतिम निर्णय हा उद्धव ठाकरे घेतली', असं सांगून माघार घेण्यास नकार दिला आहे. एवढंच नाहीतर शिवसैनिकांनीही खोतकरांनाच उमेदवारी मिळावी यासाठी दबाव टाकला आहे.
तर दुसरीकडे काँग्रेसकडून जालन्यामधून कल्याण काळे यांना उमेदवार जाहीर करण्यात आली आहे. बुधवारी औरंगाबादेत झालेल्या पत्रकार परिषदेत अब्दुल सत्तार यांनी अर्जुन खोतकरांबद्दल सुचक वक्तव्य केलं होतं. खोतकर हे निवडणुकीला उभे राहिले तर ते 2 लाख मतांनी विजयी होतील पण त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे असं सत्तार म्हणाले होते.
सत्तार यांच्या या विधानानंतर आज खोतकरांसोबत गु्प्त बैठक पार पडली आहे. शिवसेनेकडून अजूनही खोतकरांबद्दल अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे खोतकर काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष्य लागलं आहे.
================