अमरावती, 16 नोव्हेंबर : त्रिपुरा येथील कथित घटनेप्रकरणी (Tripura Dispute) अमरावतीत उसळलेल्या दगंलीनंतर (Amravati Violence) शहरात संचारबंदी (Curfew) लागू करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर गेल्या चार दिवसांपासून शहरातील इंटरनेट (Internet) सुविधा देखील बंद आहे. या हिंसाचाराप्रकरणी पोलिसांचं अटकसत्र सुरु आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलाय. पण सध्या शहरातील परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे राज्य सरकार (Maharashtra Government) संचारबंदी लवकरच मागे घेईल आणि सर्व पूर्ववत होईल, शहरातील इंटरनेट सेवा सुरु होईल, अशी अमरावतीकरांना आशा आहे. दुसरीकडे शहरातील संचारबंदी काढण्याबाबत आणि इंटरनेट सेवा सुरु करण्याविषयी अमरावतीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग (DGP Rajendra Singh) यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. त्यामध्ये त्यांनी इंटरनेट सेवा लगेच सुरु करता येणार नाही. परिस्थिती पाहून योग्य निर्णय घेतला जाईल, असं स्पष्ट केलंय. राजेंद्र सिंग यांनी अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी याबाबत माहिती दिली.
"अमरावती शहरात सध्यातरी संचारबंदी कायम राहील. तसेच इंटरनेट सुविधा देखील बंद राहणार आहे. शहरातील परिस्थिती बघून शहरातील संचारबंदी मागे घेण्याबाबत तसेच इंटरनेट सेवा सुरु करण्याविषयी निर्णय घेण्यात येईल", असं राजेंद्र सिंग यांनी सांगितलं. अमरावती हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 35 गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच 188 आरोपींना अटक करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे तूर्तास तरी अमरावतीत इंटरनेटबाबत आणि संचारबंदी हटवण्याबाबत दिलासा मिळणार नसल्याचे स्पष्ट झालं आहे.
हेही वाचा : '24 कॅरेटची शिवसेना बदलली' म्हणणाऱ्या सुधीर मुनगंटीवारांना अनिल परबांचा टोला, म्हणाले...
दुसरीकडे भाजप नेते किरीट सोमय्या हे अमरावतीत झालेल्या हिंसाचारात जखमी झालेल्यांची भेठ घेण्यासाठी शहरात येणार आहेत. पण शहरात संचारबंदी लागू असल्याने त्यांनी अमरावतीत येऊ नये, असं पत्र अमरावती पोलिसांनी सोमय्यांना पाठवलं आहे. पण सोमय्या तरीही अमरावतीला जाण्यास इच्छूक आहेत. त्यावर अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा : सॅल्यूट ! प्रोटोकॉल बाजूला ठेवत केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी विमानात केले आजारी प्रवाशावर उपचार
"किरीट सोमय्या यांनी पंधरा दिवसानंतर अमरावतीमध्ये यावं. अमरावतीमध्ये येऊन त्यांना हिंसाचार भडकवायचा आहे का? अमरावती मध्ये येऊन नौटंकी करू नये. अमरावती हा आमचा जिल्हा आणि आमचं गाव आहे. त्यांनी कुणालाही भडकवण्याचा प्रयत्न करु नये", असं यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amravati