न्यूयॉर्क, 28 डिसेंबर : भारतीय मसाल्याच्या पदार्थांचं (Indian Spices) पाश्चात्यांना, किंबहुना उर्वरित सगळ्याच जगाला पूर्वापार आकर्षण आहे. केवळ चव म्हणूनच नव्हे, तर मसाल्याचे ते पदार्थ आहारात असल्यानंतर शरीराला कोणते आणि किती लाभ होतात, याबद्दल त्या देशांत संशोधन होऊ लागल्यामुळे बरीच माहिती मिळू लागली आहे. हे सारं आत्ता सांगण्याचं कारण म्हणजे अमेरिकेची प्रसिद्ध फॅशन मॉडेल गिगी हदीद (Gigi Hadid) हिने तिच्या गर्भारपणात भारतीय मसाले आवर्जून आहारात ठेवले होते. तिने स्वतःच इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोतून ही माहिती मिळाली आहे.
'पोस्ट ए पिक' (Post a Pic) असं चॅलेंज सोशल मीडियावर सुरू आहे. त्याअंतर्गत गिगीने तिच्या आयुष्यातल्या काही क्षणांची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली. अनेकांनी तिच्या गर्भारपणाच्या काळाबद्दलची (Pregnancy) माहिती तिला विचारली होती. त्याला उत्तरं देताना तिने काही फोटो पोस्ट केले होते.
त्यापैकी एका फोटोत तिचं किचन कॅबिनेट दिसतं आहे. त्यात जिरं (Cumin), हळद (Turmeric), सुंठ (Dried Ginger)असे भारतीय मसाल्याचे पदार्थ दिसत आहेत. गर्भारपणाच्या काळात आपण आवर्जून हे पदार्थ खाल्ल्याचं तिने सांगितलं. गरम मसाला, लसूण, मिरची पावडर आदी पदार्थांचे डबेदेखील गिगीच्या किचन कॅबिनेटमध्ये दिसत आहेत.
View this post on Instagram
24 सप्टेंबर 2020 रोजी गिगी आणि तिचा पती झेन मलिक (Zayn Malik) यांना पहिल्या अपत्याची प्राप्ती झाली होती. झेनने ट्विट करून आपल्याला मुलगी झाल्याची खबर दिली होती.
एप्रिल महिन्यात 'दी टुनाइट शो' या कार्यक्रमात गिगीने आपण प्रेग्नंट असल्याचं वृत्त आपल्या चाहत्यांना सांगितलं होतं.
वास्को द गामा हा खलाशी भारतात आला होता, तेव्हाही इथल्या मसाल्याच्या पदार्थांनी आपलं जहाज तो भरून घेऊन गेला होता, हा इतिहास आपल्याला माहितीच आहे. आजच्या काळातही भारतीय मसाल्यांचं महत्त्व जगभर कायम आहे, हे यातून दिसून येतं. 'नास्ति मूलम् अनौषधं...' म्हणजेच औषधी गुण नाहीत, अशी वनस्पती अस्तित्वात नाही, असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे. मसाल्याच्या पदार्थांमध्येही बरेच गुणधर्म असून, माफक प्रमाणात आहारात असल्यास त्याचे चांगले लाभ शरीराला होतात, याबद्दल परदेशातही संशोधन झालं आहे. गिगीसारख्या फॅशन मॉडेललाही त्याची भुरळ पडावी, यातच सारं काही आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.