अकोला, 09 आॅगस्ट : संपूर्ण राज्यभरात मराठा आंदोलनाची धग सुरू असताना, अकोल्यात आज सकाळपासूनच बंद दिसून आला. आंदोलन, रॅली आणि काही ठिकाणी टायर जाळून रास्ता रोकोच्या घटनांनी बंद पाहायला मिळतोय. परंतु, अकोल्यातील अकोट इथ आंदोलनातच विवाह संपन्न झाल्यानं आगळंवेगळं आंदोलन पाहायला मिळालं, मराठा समाजातील वधू-वराने चक्क आंदोलनात आपला विवाह केलाय. ज्या आंदोलनस्थळी सरकारकडे मागणी केली जात आहे, तिथेच प्रत्येक आंदोलकांनी वधू-वरांना भावी आयुष्यांसाठी शुभेच्छा आणि आशिर्वाद देत होते.
अकोट तालुक्यातील देऊळगाव येथील तेजस्विनी गावंडेचा विवाह आज अकोला तालुक्यातील गांधीग्रामच्या अभिमन्यू अढावसोबत होता. अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी सदनमध्ये हा विवाह आयोजित करण्यात आला होता. या लग्नासाठी दोन्हीकडील पाहुणेमंडळी उपस्थित होते. वधू तेजस्विनी आणि वर अभिमन्यूसह दोन्हीकडील मंडळींनी लग्नाआधी मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यातूनच पुढे आंदोलनस्थळीच लग्न लावण्याचा निर्णय दोन्हीकडील मंडळी आणि पाहुण्यांनी घेतला.
वधू-वर आणि पाहुणे मंडळी शिवाजी चौकातील आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी घोषणाही दिल्या. त्यानंतर गडबड सुरू झाली लग्नसोहळ्याची. आरक्षणाच्या घोषणांच्या जागी मंगलाष्टकं सुरू झाली. मराठा समाज आणि आंदोलकांच्या साक्षीनं अभिमन्यू आणि तेजस्विनी वैवाहिक जीवनाच्या सूत्रात बांधले गेले.
आतापर्यंत मराठा क्रांती मोर्चाची अनेक ऐतिहासिक रुपं अख्ख्या माहाराष्ट्रानं, अनुभवली आहेत. मात्र, आजचं हे अकोटमधील लग्नाचं रुप या सर्व रुपांपेक्षा काहीसं वेगळं आणि भावनिक म्हणावं लागेल.
घोषणा थांबल्या,मोर्चेकरी बाजूला झाले, अॅम्ब्युलन्स करून दिला मार्ग !
तर राज्यभरात आज मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांची आक्रमक भूमिका बघायला मिळत असताना बुलडाण्यात या आक्रमक आंदोलनकर्त्यांनी माणुसकीचं दर्शन घडवलं. या ठिकाणी रस्त्यावर उतरलेल्या आंदोलनकर्त्यांची आरक्षणाच्या मागणीवरुन घोषणाबाजी सुरू असताना याच रस्त्यावरुन रुग्णाला घेऊन जाणारी एक अॅम्ब्युलन्स आली आणि या सर्व आंदोलनकर्त्यांनी आपल्या घोषणा थांबवत अगदी तत्परतेने या अॅम्ब्युलन्सला वाट करुन दिली. सगळीकडे सध्या मराठा आंदोलन सुरू असून आक्रमक वातावरण असताना अॅम्ब्युलन्सला तत्परतेने वाट करुन देणाऱ्या या आंदोलकांची आपल्या या कृतीतून माणुसकी दर्शन घडवलं.
कुठेही अनुचित घटना नाही
दरम्यान, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई वगळता आज राज्यभर बंदचा परिणाम दिसून येतोय. औरंगाबाद, परभणी, उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच सगळं बंद आहे. मराठवाड्यात एसटी सेवा आज बंद ठेवण्यात आली आहे. तर विदर्भातही आज अनेक ठिकाणी बंदची हाक देण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये आज बंद पाळला जातोय. खबरदारीचा उपाय म्हणून कोल्हापूरमधली इंटरनेट सेवा आज सकाळपासून बंद ठेवण्यात आलीये. कोकणात चिपळूणमध्ये मुंबई-गोवा महामार्ग अडवण्यात आला आहे. पण एकूणच आज सकाळपासून महाराष्ट्र शांत आहे. कुठेही अनुचित घटना घडलेली नाही.