#MeToo संघाच्या दबावामुळे द्यावा लागला अकबर यांना राजीनामा!

#MeToo संघाच्या दबावामुळे द्यावा लागला अकबर यांना राजीनामा!

लोकांच्या संतप्त भावना संघाने सरकारच्या कानावर घातल्या त्यामुळं शेवटी अकबर यांना पद सोडावं लागलं.

  • Share this:

नवी दिल्ली, ता.17, ऑक्टोबर : पंधरा महिला पत्रकारांच्या गंभीर आरोपानंतरही खुर्चीला चिकटून राहणारे एम.जे. अकबर आणि त्यांना पाठिशी घालणाऱ्या सरकारला अखेर राष्ट्रीय स्वयंसेवक संघापुढे झुकावं लागलं. आपल्यावर झालेले लैंगिक गैरवर्तनाचे आरोप खोटे आहेत आणि आपण न्यायालयात ते सिद्ध करू असं सांगत अकबर यांनी राजीनामा देण्यास नकार दिला होता. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी त्यावर मौन धारण केलं होतं. त्यामुळं सरकारवर चौफेर टीका होत होती. लोकांच्या संतप्त भावना संघाने सरकारच्या कानावर घातल्या त्यामुळं शेवटी अकबर यांना पद सोडावं लागलं अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीय.

सरकारनं अकबर यांची पाठराखण केल्यानं संघ अतिशय नाराज होता. त्यानंतर दिल्लीत जोरदार हालचाली सुरू झाल्या. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी मंगळवारी अकबर यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ते केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांना भेटले आणि परिस्थितीचा आढावा घेतला.

त्यानंतर डोभाल यांनी अमित शहांशी चर्चा करू आढावा घेतला. त्यावेळी महासचिव रामलाल हेही उपस्थित होते.  त्यानंतर अकबर यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा केली. त्या भेटीत अकबर यांना पद सोडावं लागेल असे स्पष्ट संकेत देण्यात आले. त्यानंतर अकबर यांनी राजीनाम्याचं पत्र पंतप्रधानांना पाठवलं.

#MeToo या चळवळीमुळं देशात वादळ निर्माण झालं. त्याची झळ केंद्रात मंत्री असलेल्या अकबर यांनाही पोहोचली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 'बेटी बचाओ,बेटी पढाओ'ची घोषणा देतात, महिला सक्षमिकरणाचा घोष करतात. मात्र असं असतानाही ते अकबर यांना पाठिशी का घालतात असा सवाल  काँग्रेसने केला होता.

केंद्रातल्या मंत्री मनेका गांधी आणि स्मृती इराणी यांनीही अकबर यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. मात्र अकबर हे पदावर कायम होते. समाजातल्या सर्वच स्तरातून सरकारवर टीका होऊ लागल्याने सरकारवरचा दबाव वाढत होता. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये चुकीचा संदेश जाईल आणि त्याचा फटका बसेल असं संघाने सरकारमधल्या जाणत्या लोकांच्या कानावर घातलं. त्यामुळं अकबर यांना पद सोडण्याचा संदेश दिला गेला.

काय होते आरोप?

#MeToo या मोहिमेत आरोप करणाऱ्या सर्व पत्रकार या प्रतिष्ठीत वृत्तपत्रांमध्ये काम करणाऱ्या आहेत. चौफेर दबाव वाढत असतानाही सरकारने अकबर यांची पाठराखण केली आहे. आपल्या विरूद्धचे सर्व आरोप हे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणि प्रतिमा मलिन करण्यासाठीच आहेत असही अकबर यांनी आपल्या खुलाश्यात म्हटलं आहे.

अकबर हे 'द टेलिग्राफ', 'एशियन एज' आणि 'द संडे गार्डियन' या वृत्तपत्रांचे संपादक होते. सध्या ते भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत. संपादक असतानाच्या कार्यकाळात नोकरीच्या मुलाखतीसाठी गेलेल्या आणि त्यांच्या काही महिला सहकाऱ्यांनीच त्यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत.

हॉटेलच्या खोलीत बोलावून अश्लिल संभाषण करणं, मद्य पिण्यासाठी आग्रह करणं, आक्षेपार्ह शेरेबाजी करणं असे अनेक आरोप एम.जे. अकबर यांच्यावर लावण्यात आले आहेत.

VIDEO: वाहन तपासणी करताना कार चालकानं वाहतूक पोलिसालाच उडवलं

First published: October 17, 2018, 6:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading