नगरमध्ये शिवसेनाच मोठा भाऊ, काँग्रेसला दणका!

नगरमध्ये शिवसेनाच मोठा भाऊ, काँग्रेसला दणका!

नगरमध्ये कुणालाच बहुमत मिळालं नसल्याने सत्ता स्थापनेसाठी कोण पुढाकार घेणार हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.

  • Share this:

अहमदनगर, 10 डिसेंबर : नगर महापालिका निवडणुकीत नगरवासियांनी परंपरा कायम राखली 68 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत कुठल्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही. बहुमसाठी 35 जागांची आवश्यकता आहे. यावेळी शिवसेनेने जोरदार धडक देत 22 जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आलाय. तर राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर आहे. भाजपला 14 जागांवर समाधान मानावं लागलं. तर काँग्रेसला फक्त 4 जागा मिळाल्या.


निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी केली होती. तर भाजप सेनेने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. त्यामुळं सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आणि शिवसेना जवळ येण्याची शक्यता आहे. आघाडीला बहुमतासाठी 11 जागांची गरज आहे.


नगरचे भाजपचे खासदार आणि ज्येष्ठ नेते दिलीप गांधी यांना मोठा राजकीय धक्का बसलाय. त्यांचा मुलगा सुवेंद्र आणि सून दीप्ती यांनी लोकांनी नाकारलं. सुवेंद्र यांचा प्रभाग 11 (ड) मधून तर त्यांच्या पत्नी दीप्ती यांचा 12 (ब) मधून पराभव झाला. सुवेंद्र यांना राष्ट्रवादीच्या शेख नजिर अहमद यांनी पराभूत केलं तर दीप्ती यांना शिवसेनेच्या उमेदवार सुरेखा कदम यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. तर भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या दोनही मुलींचा विजय झाला.


असे आहेत निकाल


 शिवसेना - 22

राष्ट्रवादी - 20

भाजप - 14

कॉंग्रेस - 4

बसप - 4

सपा - 1

अपक्ष - 3


नगरमध्ये जल्लोष करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या उत्साहानं वेगळं वळण घेतलं. कार्यकर्त्यांचा उत्साह अनावर झाला आणि त्यांनी हुल्लडबाजी करायला सुरुवात केली. काही गाड्यांची तोडफोडही करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार करत कार्यकर्त्याना पांगवलं. यावेळी अनेक मोटरसायकल आणि इतर गाड्यांची तोडफोड केली केली गेली. सेलिब्रेशन करताना ते शांततेच्या मार्गानेच करावं असं आवाहन पोलिसांनी केलंय.


नगरला 68 जागांसाठी 339 उमेदवार रिंगणात होते. 2003 मध्ये अस्तित्वात आलेल्या महानगर महापालिकेच्या आतापर्यंत तीन निवडणुका झाल्या आहेत. 2003, 2008 व 2013 या तिन्ही निवडणुकांमध्ये कोणत्याही एका पक्षाला एकहाती सत्ता मिळालेली नाही.


2013 चं बलाबल


महानगरपालिकेच्या 2013 मध्ये कुठल्याही एका पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं. लोकांनी कुठल्याही एका पक्षाच्या हाती सत्ता न देता  त्रिशंकू पालिकेसाठी कौल मिळाला होता. त्यावेळी शिवसेनेला 18, राष्ट्रवादी काँग्रेसला 18, भाजप 9, काँग्रेस 11, मनसे 4, तर अपक्षांना 8 जागा मिळाल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 10, 2018 05:19 PM IST

ताज्या बातम्या