संगमनेर, 25 मे: काँग्रेसचे नेते अब्दुल सत्तार यांनी भाजपात जाण्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आपण राहणार असल्याचं अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केलं. तसंच विखे पाटील हे 1 तारखेनंतर शपथ घेतील, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
काँग्रेसला एकामागून एक धक्के बसताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर आता काँग्रेसमधून आऊटगोइंगला सुरूवात झाली. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुलाच्या प्रचारासाठी नगरमध्ये भारतीय जनता पार्टीचा उघड उघड प्रचार केला. लवकरच ते भाजपात प्रवेश करणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांना मानणारे अब्दुल सत्तार यांनीही आपण राधाकृष्ण विखे पाटील जो निर्णय घेतील त्या सोबत राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे अब्दुल सत्तार आज बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर गावात एका कार्यक्रमासाठी आले होते आणि राधाकृष्ण विखे पाटीलही त्यांच्यासोबत उपस्थित होते.
विशेष म्हणजे, अब्दुल सत्तार यांनी निवडणुकीच्या आधीच काँग्रेसमध्ये बंड पुकारले होते. पक्षाने उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला होता. एवढंच नाहीतर त्यांनी सेनेचे नेते अर्जुन खोतकर यांचीही भेट घेतली होती. परंतु, ऐनवेळी त्यांनी उमेदवारी मागे घेतली होती. आता विधानसभेच्या तोंडावर सत्तार यांनी आता भाजपची वाट निवडली आहे.
============================