मुंबई, 24 जून : राज्यात एकाच महिन्यात दहा दिवसांच्या अंतराने एकाच दिवशी 4161 एवढ्या विक्रमी संख्येत कोरोनाच्या बरे झालेल्या रुग्णांना आज घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 73 हजार 792 रुग्ण बरे झाले आहेत. मुंबई मंडळातील मुंबई मनपा, ठाणे, पालघर, रायगड या चार जिल्ह्यात आज 3530 रुग्ण घरी सोडण्यात आले. राज्यात मुंबई मंडळात आतापर्यंत 50 हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
दुसरीकडे, मुंबईतील रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आणखी वाढून आता तब्बल 39 दिवसांवर पोहोचला आहे. रूग्ण वाढीचा सरासरी दरहीआणखी कमी होऊन आता 1.81% असा आहे. एच पूर्वची आघाडीही आणखी वाढली असून दुपटीचा कालावधी 88 दिवसांवर गेला आहे. एच पूर्व शिवाय एफ उत्तर 82 , ई विभागाचा 74, एल विभाग 70 दिवस असा रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी नोंदवला गेला.
29 मे रोजी राज्यात एकाच दिवशी 8381 रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर सातत्याने बरे होणाऱ्या रुग्णांचा आलेख वाढत असून सुमारे 15 दिवसानंतर 15 जून रोजी 5071 एवढे रुग्ण बरे होऊन एकाच घरी सोडण्यात आले. आज त्यानंतर पुन्हा एकदा बरे होणाऱ्या रुग्णांची विक्रमी संख्या गाठली आहे.
राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे 51 टक्के एवढा असून राज्यात सध्या उपचार सुरू असलेल्या एकूण (ॲक्टीव्ह) रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचा कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने 50 टक्क्यांवर कायम आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
आज सोडण्यात आलेल्या 4161 रुग्णांमध्ये मुंबई मंडळात 3530 (आतापर्यंत एकूण 51 हजार 737) तर त्यापाठोपाठ पुणे मंडळात 355 (आतापर्यंत एकूण 11 हजार 299), नाशिक मंडळात 139 (आतापर्यंत एकूण 3652), औरंगाबाद मंडळ 21 (आतापर्यंत एकूण 2562), कोल्हापूर मंडळ 24 (आतापर्यंत एकूण 1383), लातूर मंडळ 7(आतापर्यंत एकूण 532), अकोला मंडळ 26 (आतापर्यंत एकूण 1448), नागपूर मंडळ 59 (आतापर्यंत एकूण 1179) रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत.
संपादन - अक्षय शितोळे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.