किशोर गोमासे, प्रतिनिधी
वाशिम, 22 सप्टेंबर : वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्याच्या मोतसावंगा येथील 4 जण धरणाच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहामध्ये वाहून गेल्याची धक्कादायक घटना आज घडली.
मोतसावंगा येथील भाऊराव खेकडे, महादेव इंगळे, गोपाल जामकर, दिलीप वाघमारे हे चार जण सांडव्यातून येत होते. त्यावेळी अचानक मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाढला. त्यामुळे या प्रवाहामध्ये हे चारही जण वाहून गेले होते.
#वाशिम : जिल्ह्याच्या मंगरूळपीर तालुक्यातील मोतसावंगा धरणाच्या सांडव्यामध्ये 4 जण गेले वाहून pic.twitter.com/Ws96TPd5aK
— News18Lokmat (@News18lokmat) September 22, 2020
पाण्याच्या प्रवाहाचा वेग इतका होता की, दोघे जणांना पाण्यात तोल गेला आणि ते वाहत गेले. त्यांना वाचवण्यासाठी इतर दोघांनीही धाव घेतली. पण तेही पाण्यात वाहून गेले. विशेष म्हणजे, हे चौघेही जण पट्टीचे पोहणारे होते. मात्र, पाण्याचा प्रचंड वेग असल्यानं ते वाहून गेले.
65 वर्षांपासूनचा कायदा बदलला, डाळी, तेल आणि कांदा आता ‘जीवनावश्यक वस्तू' नाहीत
घटनास्थळी मंगरुळपिर तहसीलदार आणि आसेगांव पोलीस दाखल झाले असून पिंजरच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाने वाहून गेलेल्या भाऊराव खेकडे यांचा मृतदेह शोधला असून इतर तिघांचा शोध सुरू होता. अखेर स्थानिक ग्रामस्थ आणि पिंजरच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाने वाहून गेलेल्या भाऊराव खेकडे,महादेव इंगळे,गोपाल जामकर,दिलीप वाघमारे या चौघांचा मृतदेह शोधला आहे.
मोतसावंगा परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने बचाव कार्यात अडथळे येत होते. या दुर्घटनेमुळे मोतसावंगा गावावर शोककळा पसरली आहे.