• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • लोकशाहीच्या मंदिरात ठोकशाही पण लढा सुरूच ठेवणार - विरोधक

लोकशाहीच्या मंदिरात ठोकशाही पण लढा सुरूच ठेवणार - विरोधक

  • Share this:

Dhanajay_vikhe

22 मार्च :  लोकशाहीच्या मंदिरात लोकशाही नाही तर ठोकशाही सुरू असल्याचा आरोप करत सरकारने लोकशाहीचा खून केला असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. त्याचबरोबर, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी निलंबनच काय कोणतीही कारवाई झाली तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपला लढा सुरूच ठेवणार असल्याचा निर्धारही विरोधकांनी व्यक्त केला आहे.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 18 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडला. अर्थसंकल्प मांडत असताना विरोधकांनी शेवटपर्यंत सभागृहात गदारोळ सुरू ठेवत आपला विरोध दर्शवला होता. त्याच पार्श्वभूमिवर विरोधी आमदारांचं 31 डिसेंबरपर्यंत निलंबन करण्यात आलं आहे. १९ आमदारांचे निलंबन झाल्याने विरोधकही आक्रमक झाले आहेत. विधीमंडळाच्या आवारात विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सरकारवर टीकास्त्र सोडले.  

दरम्यान,  ही कारवाई म्हणजे भाजपने बहुमताच्या जोरावर घेतलेला चुकीचा निर्णय असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. तर विधानसभेतील विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारने सूड भावनेतून ही कारवाई केली असल्याचं म्हटलं आहे. निलंबन मागे घेण्यासाठी सरकारकडे भीक मागायला जाणार नसल्याचेही विखे पाटील यावेळी बोलताना म्हणाले. तसंच, सरकारने निलंबनाची कारवाई केली तरी कर्जमाफीसाठी आंदोलन सुरुच राहील असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणालेत. आम्ही जनतेत जाऊन सरकारविरोधात आंदोलन करु असंही त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर, सरकारने लोकशाहीची हत्या केली असा आरोपही त्यांनी केला.

तर सरकारने केलेली कारवाई दुर्भाग्यपूर्ण असून सरकारने विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला. आमदारांना निलंबित करुनही महाराष्ट्राचा आवाज दाबता येणार नाही असं राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


First published: