• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • फिल्म रिव्ह्यु : 'धग'

फिल्म रिव्ह्यु : 'धग'

  • Share this:

अमोल परचुरे,समीक्षक राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर उमटवणारा 'धग' सिनेमा.. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यावर काही दिवसांतच हा सिनेमा रिलीज होऊ शकला असता तर बॉक्स ऑफिसवर त्याची अधिक 'धग' बघायला मिळाली असती, पण काही कारणांमुळे सामान्य प्रेक्षकांना एवढ्या उशिरा सिनेमा बघायला मिळणार आहे. दरम्यानच्या काळात 'फँड्री'सारखा सिनेमा येऊन गेला, ज्याने प्रेक्षकांची आणि समीक्षकांची पसंती मिळवली. फँड्रीनंतर आता धग रिलीज होत असल्यामुळे काही प्रमाणात 'फँड्री'बरोबर तुलना अपरिहार्य आहे. 'धग' हा सिनेमा म्हणून 'फँड्री'पेक्षा पूर्णपणे वेगळा असला तरी त्याची मांडणी, गावातल्या गरिबीचं थेट चित्रण, जातीव्यवस्थेचा विळखा या गोष्टी 'धग'मध्येही आहेत. काही प्रेक्षकांना ही 'धग' डिप्रेसिव्ह वाटू शकेल, फेस्टीव्हल सिनेमा अशी त्याची संभावनाही केली जाईल, पण तरीही मराठी सिनेमाच्या बदलत्या चित्रात 'धग' चा आवर्जून उल्लेख करावाच लागेल. काय आहे स्टोरी ? 78dhag marathi movie (1) स्मशानात राहणारं एक गरीब कुटुंब...गावातल्या लोकांच्या अंत्यसस्कारातून मिळणार्‍या पैशातून त्यांचा संसार चालतो. त्यामुळे गावात कुणाचा मृत्यू झाला तर त्याच्या आत्म्याला शांती मिळू दे अशी प्रार्थना करणारं पण मनातून खुश होणारं हे घर...आपल्या मुलानं शिकावं आणि या परंपरागत चाल आलेल्या स्मशानातल्या कामापासून स्वत:ची आणि कुटुंबाची सुटका करावी ही शिरप्याची अपेक्षा असते, अर्थात या अपेक्षा पूर्ण होतात का, शिरप्याच्या कुटुंबाला किती हालअपेष्टांतून जावं लागतं त्याची धग सिनेमात बघायला मिळेल. शिवाजी लोटन पाटील या दिग्दर्शकानं 'धग'ची कथा पडद्यावर मांडताना बर्‍याच ठिकाणी ब्लॅक ह्युमरचा उत्तम वापर केलाय. परफॉर्मन्स 78dhag marathi movie धगमधील सर्वांचाच अभिनय एकदम दमदार आहे. सर्वात आधी उल्लेख करावा लागेल हंसराज जगताप या बालकलाकाराचा, त्याची बहीण झालेली चिमुकली नेहा दखिनकर सुद्धा अगदी सहज काम करुन जाते. बालकलाकार एवढा सुंदर आणि परिपक्व अभिनय कसं काय करू शकतात असाच विचार मनात येतो. उपेंद्र लिमयेच्या रोलची लांबी तशी कमी आहे, पण त्यातही त्याने एकदम पॉवरफुल अभिनय केलाय. दारु पिऊन आपलं दु:ख सांगणार्‍या सीनमध्ये तर त्याने सिक्सरच मारलीये. उषा जाधवने सुद्धा मुलाबरोबरच्या सीन्समध्ये आईचं दु:ख खूप प्रभावीपणे सादर केलंय. सामान्यत: असा विषय असलेले सिनेमे डार्क असतात, त्यांची मांडणी एकाच प्रकारची असते, मग त्यांना कलात्मक सिनेमांचा शिक्का मारला जातो, पण धग त्या सिनेमांपेक्षा वेगळा आहे. टेकिंग-एडिटिंग या तांत्रिक गोष्टींमध्ये खूपच वरच्या दर्जाचं काम झालेलं आहे. 'धग'ला रेटिंग 100 पैकी 70

First published: