मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

ज्येष्ठ रिपाइं नेते रा.सु.गवई यांचं दीर्घ आजारानं निधन

ज्येष्ठ रिपाइं नेते रा.सु.गवई यांचं दीर्घ आजारानं निधन

r s gavai25 जुलै : दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते, रिपाइं गवई गटाचे अध्यक्ष आणि माजी राज्यपाल रा. सु.गवई यांचं दीर्घ आजाराने नागपुरात निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. गवई यांच्यावर गेल्या काहीदिवसांपासून नागपुरातील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज दुपारी एकच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

रामकृष्ण सुर्यभान गवई उर्फ रा.सु.गवई यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये गवई गटाची स्थापना केली होती. अमरावती मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले होते. तसंच 1964 ते 1994, असे 30 वर्षं ते विधान परिषदेचे आमदार होते. त्यानंतर 1968-1978 या काळात ते विधानपरिषदेचे उपसभापतीही होते. गवई यांनी बिहार, सिक्कीम आणि केरळचे राज्यपाल म्हणून काम पाहिलंय. गवई यांच्या निधनामुळे दलित चळवळीतला निष्ठावंत नेत हरपला अशी भावना व्यक्त होतं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी गवई यांचे सुपूत्र न्यायमुर्ती भुषण गवई यांच्या निवसस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. दादासाहेब गवई म्हणून ओळखले जाणार्‍या रा सू गवई यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबतही काम केले होते.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून त्यांनी राजकीय क्षेत्रातही मोठं काम केलं. विधान परिषदेत त्यांनी सदस्य, उपाध्यक्ष, अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते म्हणून काम केले. लोकसभा सदस्य, केरळ आणि बिहारचे राज्यपाल पदही त्यांनी भुषवलं होतं. गवई यांच्या जाण्याने रिपब्लिकन चळवळीची मोठी हानी झाली असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्य सरकारच्या वतीने दिवंगत रा.सु.गवई यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रा. सु.गवई यांच्या निधनाचे वृत्त कळवण्यात आले असून केंद्र सरकारच्या वतीने आपण श्रद्धांजली अर्पण केल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. रा. सु. गवई यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी नागपूरच्या दीक्षाभुमी येथे ठेवण्यात आले असून उद्या रविवारी दुपारी 3 वाजता गवई यांच्या पार्थिवावर त्याच्या मुळ गावी अमरावती जिल्ह्यातील दारापुर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

[if0] Follow @ibnlokmattv[sc0]

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: रिपाइं