• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • आवर्जून बघावा असा 'आँखो देखी'

आवर्जून बघावा असा 'आँखो देखी'

  • Share this:

अमोल परचुरे, समीक्षक आँखो देखी - हा अभिनेत्याबरोबरच आता दिग्दर्शक म्हणूनही स्थिरावलेला आहे. त्याच्या जवळपास प्रत्येक सिनेमात थोडी फँटसी असते, जी आजच्या काळाशी सुसंगत असते. पण 'आँखो देखी'मध्ये फँटसी कमी आणि बुद्धीला चालना देणारे घटक अधिक आहेत. आँखो देखी मध्ये सगळंच आहे, एंटरटेनमेंट आहे, कॉमेडी आहे, एक विचार आहे, फॅमिली ड्रामा आहे, अगदी सगळं आहे आणि तेसुद्धा कंटेटने भरलेलं आहे. असे सिनेमे बघितले की जाणवतं, पटकथाकार आणि दिग्दर्शक यांना कागदावर उमटलेला विचार पडद्यावर साकारताना किती मेहनत लागली असेल ते..गर्दीमागे धावणं ही तशी जुनी मानसिकता आहे.

255 ankhon dekhi 6363

फक्त आपल्याच देशात नाही तर जगभरात ही मानसिकता भिनलेली आहे, आणि आता तर सोशल मीडियाच्या युगात किती लाईक्स मिळाले, कितीजण फॉलो करतायत यावर तुमची किंमत ठरते. फेसबुक, ट्विटरसारख्या असंख्य सोशल वेबसाईट्सवर याच मानसिकतेचा वापर करुन बातम्या पसरवल्या जातात. कोणत्याही प्रॉडक्टची खोटी हवा करायची असेल तर हाच फंडा वापरला जातो. आँखे देखी या सिनेमात याचा कुठे उल्लेखही न करता त्यावर अतिशय प्रभावी भाष्य करण्यात आलेलं आहे. डोळ्यांना जे दिसतंय, कानांना जे ऐकू येतंय तेच सत्य आहे असं जर आपण मानायला लागलो तर आयुष्याची दिशाच बदलून जाईल.

पण आँखो देखी सिनेमाचा नायक म्हणजेच बाऊ जी अचानक असाच निर्णय घेतात. देवळातल्या पुजार्‍यानं मिठाई दिली आणि सांगितलं की तो प्रसाद आहे, तरी त्यावर विश्वास न ठेवता मिठाई म्हणून त्याचा आस्वाद घ्यायचा. सफरचंदाची गोडी चाखायची, ते काश्मीरहून आलंय की, हिमाचल प्रदेशमधून, यामुळे काही त्याची गोडी वाढत नाही. अशा प्रकारच्या सीन्समध्ये अंडरकरंट खूप आहेत. व्हॉटसऍपवर एखादा फोटो बघून आपण त्यावर हल्ली विश्वास ठेवतो आणि लगेच फॉरवर्डही करतो. याच सिंड्रोमला हसत हसत फटकारे मारणारा सिनेमा आहे आँखोदेखी...

काय आहे स्टोरी 22rajat-kapoor आँखोदेखी हा सिनेमा म्हणजे एक ट्रीट म्हणायला पाहिजे. असे फार कमी सिनेमे येतात जे आपल्याला सिनेमा बघताना खिळवून ठेवतात आणि सिनेमा संपल्यावर विचार करायला लावतात. फॅटसो, रघू रोमिओ, मिथ्या असे सिनेमे दिग्दर्शित केलेल्या रजत कपूरने आपलं सगळं कौशल्य यात पणाला लावलंय. दिग्दर्शक म्हणून त्याच्यात आलेली सखोल समज यात स्पष्टपणे जाणवते. सिनेमा कुठेही लांबणार नाही, भरकटणार नाही याची पुरेपूर काळजी त्याने घेतलेली आहे.

बाऊजी ही व्यक्तिरेखा महत्त्वाची आहेच, पण त्यांच्या आसपास घडणार्‍या घटना, त्यांचं चित्रण, एकंदरित कथेमध्ये त्याची मांडणी हे सगळं एका मस्त लयीत सादर करण्यात आलंय. बाऊजींचं वर्तन हा काहीजणांसाठी विक्षिप्तपणा ठरायला लागतो, पण त्याचवेळी त्यांचे काही भक्तही बनतात. इथे तर आपल्यामागे येणार्‍या गर्दीचा आपल्या सोयीनुसार अर्थ लावणार्‍या सगळ्या प्रकारच्या नेत्यांना सणसणीत चपराकच लगावलीये. असे अनेक प्रसंग आहेत, जे बघताना आपण त्यात हरवून जातो, आपल्याशी त्यांचा नकळत संबंध जोडतो. सिनेमा जुन्या दिल्लीतला असला तरी कोणत्याही शहरात घडू शकेल अशा कथेत प्रेक्षकही आपणहून ओढला जातो. नवीन काय anko200314 रजत कपूरच्या या प्रयत्नांना तांत्रिक साथसुद्धा उत्तम लाभलीये. रफी महमूदचा कॅमेरा जुन्या दिल्लीतल्या गल्ल्यांमधून किंवा घरांमध्ये अगदी सहज फिरतो, सिनेमाचा जो मिश्कील बाज आहे तोच कॅमेरामधूनही डोकावतो. एडिटिंग असेल किंवा रेसूल पोकुट्टीचं साऊंड डिझाईन, सगळंच मस्त जमून आलंय. सागर देसाईचं संगीतसुध्दा सिनेमात अगदी छान मिसळून गेलंय, कैलाश खेरच्या आवाजातलं गाणं ऐकताना तर मंत्रमुग्ध व्हायला होतं. आँखो देखी हा खर्‍या अर्थानं सगळ्याच बाबतीत आशयघन असा सिनेमा झालेला आहे. परफॉर्मन्स थिएटरमध्ये मोठी कारकीर्द, पण मोठ्या पडद्यावर कधी साईड रोल्स तर कधी विनोदी भूमिका...अशा संजय मिश्रा यांची एवढी मोठी भूमिका असलेला पहिलाच सिनेमा, आणि त्यांनी या भूमिकेला पूर्णपणे न्याय दिलेला आहे. बाऊजींचे प्रत्येक इमोशन्स, जगासाठी असलेला विक्षिप्तपणा त्यांनी अतिशय सहजपणे दाखवलेला आहे. केवळ त्यांच्या अभिनयामुळेच भूमिकेचा आब कायम राहिलाय आणि प्रेक्षक शेवटपर्यंत बाऊजींच्या बाजूने राहिलेत. बाकी सर्व कलाकारांनीसुद्धा मनापासून काम केलंय. सीमा पाहवा यांनी सुद्धा बाऊ जींच्या पत्नीच्या भूमिकेत खणखणीत काम केलेलं आहे. खरंतर, बर्‍याच दिवसांनी असा सिनेमा आलाय की, त्याबद्दल बराच वेळ बोलता येईल, पण थोडक्यात एवढंच सांगतो की, खुसखुशीत, मिश्कील, दर्जेदार अशा विनोदाचा आणि तितक्याच दर्जेदार आशयाने समृद्ध असलेला हा सिनेमा आवर्जून बघायलाच हवा असा आहे. रेटिंग 100 पैंकी 80

First published: