लातूर, 24 ऑक्टोबर : स्वयंपाक चांगला येत नाही असं म्हणत एका विवाहितेला धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून पतीने खून केल्याची धक्कादायक घटना लातूर तालुक्यातील धनेगाव येथे घडली. याबाबत लातूर ग्रामीण पोलिसात पती विठ्ठल उर्फ सचिन धडे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद आहे. हत्येनंतर विठ्ठल धडे फरार झालाय.
धनेगाव येथील दीपाली धडे या विवाहितेस पती विठ्ठल उर्फ सचिन धडे याने तुला भाजी येत नाही, चांगला स्वयंपाक येत नाही असे म्हणून तसंच किरकोळ कारणावरून सतत त्रास दिला. शनिवारी रात्री याच कारणावरून पती विठ्ठल याने धारदार शस्त्राने दीपाली यांच्या गळ्यावर वार केले. यात त्या गंभीर जखमी झाल्या. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तीचा मृत्यू झाला. खून करून पती विठ्ठल फरार झाला आहे.
दीड वर्षांपूर्वी दीपाली यांचा शिरूर अनंतपाळचा मुळ रहिवासी विठ्ठल याच्यासोबत विवाह झाला होता. सध्या दीपाली माहेरीच धनेगाव येथे राहत होत्या. विठ्ठल यास दारूचे व्यसन होते. व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे कोणत्याही कारणावरून तो बायकोला मारहाण करीत असे चार दिवसांपूर्वीच विठ्ठल धनेगावला आला होता.
त्याने सासरवाडीतील सर्व नातेवाईक बाहेर कामानिमित्त गेल्याची संधी साधून दीपालीसोबत भांडण काढले आणि धारदार शस्त्राने तिच्यावर वार करून तिचा खून केला, असे वडील आनंद एकनाथ मेकले यांनी लातूर ग्रामीण पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे. त्यानुसार विठ्ठल याच्याविरुद्ध कलम 302, 498 भादंविनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रफीक सय्यद करीत आहेत.आरोपी अद्याप फरार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.