16 फेब्रुवारी : शिवसेना म्हणते सत्तेतून बाहेर पडू, मग थांबला कशाला ? तुम्हाला कुणी अडवलं अजून किती अपमान सहन करणार अशी घणाघाती टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.
पुण्यात मनसेचे अध्य़क्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेवर सडकून टीका केली. तसंच सभेत त्यांनी नाशिकच्या कामाचा पाढा वाचत प्रझेंटेशनच दाखवलं.
शिवसेना-भाजपची सभा की आखाडा असा प्रश्न पडलाय. पण नुसतं लोकांना मूर्ख बनवण्याचा धंदा सुरू आहे. यांच्या भांडणाचा आणि जनतेचा काहीही संबंध नाही. शिवसेना म्हणजे आम्ही सत्तेतून बाहेर पडू, मग कशाला थांबला. तुम्हाला कुणी अडवलंय. शिवस्मारकाच्या भूमिपूजनाच्या वेळी एकाच बोटीवर असून मोदींनी उद्धव ठाकरेंना ढुंकूनही पाहिलं नाही. यापेक्षा जास्त अपमान काय असू शकतो. एवढाच जर स्वाभिमान होता तर तेव्हाच सत्तेतून बाहेर पडायचं असतं अशी टीका राज ठाकरेंनी केली.
तसंच भाजपचा चढता आलेख खाली यायला सुरुवात झालीये. जो पक्ष पारदर्शकतेच्या गप्पा करतोय. त्याच पक्षाने गुंडांचं शुद्धीकरण सुरू केलं. नाशिकमध्ये भाजपने 77 गुंडांना उमेदवारी दिली आहे. असा आरोपही राज ठाकरेंनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.