Home /News /news /

शिवजयंती तिथीनुसारच साजरी करावी -राज ठाकरे

शिवजयंती तिथीनुसारच साजरी करावी -राज ठाकरे

मुंबई – 26 मार्च : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही तारखेप्रमाणेच तिथीनुसार मोठ्या उत्साहात आणि एखाद्या सणाप्रमाणे साजरी करावी असं आवाहन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज केलं. आज महाराष्ट्रात तिथीनुसार शिवजयंती साजरी होत आहे. यानिमित्ताने राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन हे आवाहन केलं.

राज ठाकरे म्हणाले, आपले राजे शिवाजी महाराजांच्या जयंतीबाबत बोलले जाते. तारखेनुसार की तिथीनुसार शिवजयंती साजरी करावी असा प्रश्न पडतो. पण शिवरायांची तारखेप्रमाणेच तिथीनुसारही मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात जयंती साजरी केली पाहिजे. मी एकदा कालनिर्णय कॅलेंडरचे साळगावकर यांच्याकडे गेलो होतो. त्यावेळी मी त्यांना या घोळाबाबत विचारले होते. त्यावेळी साळगावकरांनी मला सांगितले होते की, आपण मराठी लोक सर्व सण तिथीनुसार साजरे करतो, तारखेनुसार नाही. त्यामुळे शिवरायांची जयंतीही तिथीनुसार साजरी करायला हवी. तेव्हापासून मी शिवजयंती तिथीनुसार साजरी व्हायला हवी या मताशी आलो. मराठी बांधव गुढीपाढवा, दसरा व दिवाळी हे सण ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात साजरी करतात त्याचपद्धतीने तिथीनुसार येणारी शिवजयंतीही साजरी केली पाहिजे असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Raj thackray3123

आज तिथीनुसार होणार्‍या शिवजयंतीची तयारी यंदा मनसेने जोरदार केली. आज सकाळी दादरमधील शिवाजी पार्कातील महाराजांच्या पुतळ्याला राज ठाकरे यांनी वंदन केलं. या वेळी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. ढोलताशा, तुतार्‍या, मावळ्यांच्या आणि पारंपरिक वेशातील मनसैनिकांनी फेरी काढली. यावेळी राज ठाकरेंसह मनसेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यानंतर राज ठाकरेंनी शिवाजी पार्कातील बाळासाहेबांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतलं.

दरम्यान, शिवजयंतीनिमित्त राज ठाकरे यांच्या आवाजातील एक व्हिडिओ मनसेने प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओमध्ये रायगड आणि राज्यातले इतर गड, किल्ले, दुर्ग यांचा वापर करीत शिवाजी महाराजांच्या कार्याचे महत्त्व दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मनसेचे उपाध्यक्ष अभिजित पानसे यांनी चित्रफितीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा व्हिडिओ तयार करून अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहिली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


First published:

Tags: Raj Thackray, Shivaji maharaj, Shivjayanti, छत्रपती शिवाजी महाराज, राज ठाकरे

पुढील बातम्या