मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /विद्यार्थ्यांनो 7 रुपयात जेवण करा, आश्रमशाळेतला धक्कादायक प्रकार

विद्यार्थ्यांनो 7 रुपयात जेवण करा, आश्रमशाळेतला धक्कादायक प्रकार

  nandurbar_schoolनंदुरबार - 20 जानेवारी : आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेमधील मुलांना एकवेळच्या जेवणासाठी अवघे 7 रुपये खर्च केले जात असल्याची बाब समोर आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील झापी, सिंदीदिगर, त्रिशुल, शेलगदा, जांगठी, वळवाण आणि गमण या अतिदुर्गम भागातील या आश्रमशाळा आहेत. या सात आश्रमशाळांमधून 2 हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

  शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शासनाकडूनच दोन वेळच जेवण देण्यात येतं. पण अतिदुर्गभ भागात या शाळा असल्याची अडचण लक्षात घेवून एका शासननिर्णयाद्वारे या शाळांना ठेकेदाराद्वारे भोजन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या ठेकेदाराला एका विद्यार्थ्याच्या जेवणासाठी महिन्याकाठी अवघा 500 रुपये दिले जात असून यात दोन वेळच्या जेवणासोबत एक वेळच्या नाष्ट्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळेच या सर्व गोष्टीचा गोळाबेरजी करता विद्यार्थ्यांच्या एकावेळेच्या जेवणासाठी अवघे सात रुपये आणि नाष्ट्यासाठी तीन रुपये दिले जात आहे. ठेकेदारही त्याला मिळणाऱ्या पैशात पातळ दाळ, करपलेली कच्ची भाकर किंवा पोळी आणि दर्जाहीन भातच विद्यार्थ्यांना जेवणातून देतांना दिसत आहे.  विद्यार्थ्यांना या सा-याच दर्जाहीन जेवणामुळे पोटाचे विकार होत आहे. त्यामुळेच नाईलाजास्तव अर्धपोटी झोपण्याची वेळ त्यांच्यावर ओढावत आहेत.

  'हे तर विद्यार्थ्यांचं कुपोषण'

  खरं तर आदिवासी विद्यार्थ्यांच्या जेवणाबाबत खुद्द सर्वोच्च न्यायालयानेही एक दर्जा निश्चित केला आहे, असे असतानाही शासकीय आश्रमशाळांमधून जेवणाबाबत होणारीही नियमांची पायमल्ली विद्यार्थ्यासाठी घातक ठरणारी आहे. या सगळ्या प्रकार समोर आल्यावर सामाजिक कार्यकर्ते संतप्त झाले असून आश्रमशाळेमधूनच विद्यार्थ्यांना कुपोषित केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय.

  'ठेकेदार दागिने गहाण ठेवून चालवतो मेस'

  दुसरीकडे ठेकेदारही दर्जाहीन जेवणाबाबत आपली असमर्थता दर्शवत आहे. इतकंच काय तर विभागाकडून इतक्या अल्पदरातल्या ठेक्याचे गेल्या दीडवर्षांपासून बिलही मिळाले नसल्याने घरातील चांदीच गहाण ठेवून विद्यार्थ्यांना कसेबसे दोन वेळचे जेवण देत असल्याचं सांगत आहेत. तर या परिस्थितीबाबत या सातही शाळांचे मुख्याध्यापकही हतबल दिसून येत आहे.

  +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

  [if0] Follow @ibnlokmattv[sc0]

  +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  First published: